Oplus_131072
काशिनाथ शिंदे
सोलापूर, : लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा महासागर असलेल्या आषाढी वारी २०२६ दरम्यान भाविकांना सुरक्षित, सुरळीत आणि शांततापूर्ण वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर जिल्हा पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. यंदाच्या वारीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेवर करडी नजर ठेवली जाणार आहे.
याबाबत माहिती देताना सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले की, वारी मार्गावर ड्रोन सर्व्हेलन्स, आधुनिक मॉनिटरिंग सिस्टीम, विस्तृत सीसीटीव्ही नेटवर्क, नियंत्रण कक्ष तसेच अन्य तांत्रिक साधनांच्या माध्यमातून प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल. गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण, संशयास्पद हालचालींवर तत्काळ कारवाई आणि आपत्कालीन परिस्थितीला जलद प्रतिसाद देण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
वारकऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत पोलीस प्रशासनाने मनुष्यबळासह तंत्रज्ञानाची प्रभावी सांगड घालत अभेद्य सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. यामुळे लाखो भाविकांची आषाढी वारी अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि निर्विघ्न पार पडणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
“सुरक्षित वारी… सुरक्षित वारकरी…!” या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवत सोलापूर पोलीस प्रशासनाने यंदाच्या आषाढी वारीसाठी अत्याधुनिक सुरक्षा कवच उभे केले असून, भाविकांना निश्चिंतपणे विठुरायाच्या दर्शनाचा आनंद घेता यावा यासाठी सर्व यंत्रणा सतर्कपणे कार्यरत आहे.
