Oplus_131072
काशिनाथ शिंदे
पुणे, नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या कथित मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्या संयुक्त धडक कारवाईत पर्दाफाश झाला आहे. या कारवाईत तब्बल २.५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तपास यंत्रणांनी पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सांगली आणि भिवंडी येथे एकाच वेळी धाडसत्र राबवत या रॅकेटवर मोठा घाव घातला. प्राथमिक तपासात दुधात केमिकलयुक्त पाणी, दूध पावडर तसेच दुर्गंधी लपवण्यासाठी शाम्पू मिसळून भेसळ केली जात असल्याचे समोर आले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे हे कथित भेसळयुक्त दूध काही नामांकित डेअरी कंपन्यांपर्यंत पोहोचवले जात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले असून संपूर्ण पुरवठा साखळीची कसून चौकशी सुरू आहे.
या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, भेसळयुक्त दूध किती प्रमाणात बाजारात वितरित करण्यात आले आणि यामागील मुख्य सूत्रधार कोण आहेत, याचा शोध पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन घेत आहेत. आगामी तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टीप : या प्रकरणातील माहिती ही तपास यंत्रणांच्या प्राथमिक कारवाईवर आधारित आहे. अंतिम निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रिया आणि अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होतील.
