पुण्यातील १०० शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञांचा सहभाग; विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक कौशल्य विकासावर
काशिनाथ शिंदे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) कौशल्य शिक्षण विभागाच्या वतीने ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात पुण्यातील विविध शाळांमधील सुमारे १०० शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञांनी सहभाग घेतला.
इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याधारित शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, याबाबत या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आले. पारंपरिक शिक्षणासोबतच कृतीआधारित आणि अनुभवाधारित शिक्षणाला प्राधान्य देण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक कौशल्ये, सर्जनशीलता, सहकार्याची भावना आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आला.
मेळाव्यात इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर आधारित प्रकल्प आणि प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. कार्यप्रक्रिया, यंत्रे व साहित्याचा वापर तसेच मानवी सेवा या विषयांद्वारे कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देण्याबरोबरच त्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या वृंदा मुलतानी जोशी, ब्लूमिंग डेल इंटरनॅशनल स्कूलचे डॉ. हितेश शर्मा, एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी यांच्यासह शिक्षकवर्ग उपस्थित होता.
पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सहभागी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी विभाग समन्वयक वंदना सांगळे, प्रशासकीय व्यवस्थापक डॉ. मनीष ढेकळे आणि कौशल प्रयोगशाळेच्या प्रमुख वर्षा देशमुख यांनी विशेष सहभाग घेतला.






