सायबर पथकाची तत्पर कारवाई; बँक आणि मर्चंटकडे पाठपुरावा करून मिळवले पैसे
काशिनाथ शिंदे
पुणे (प्रतिनिधी) : अनोळखी लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाईलमध्ये संशयास्पद ॲप डाउनलोड झाले आणि एका महिलेची तब्बल ४० हजार रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर येरवडा पोलिसांच्या सायबर पथकाने तातडीने पावले उचलत फसवणूक झालेली संपूर्ण ४० हजार रुपयांची रक्कम महिलेला परत मिळवून दिली.
तक्रार प्राप्त होताच सायबर पथकाने मोबाईलच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक उपाययोजना केल्या. तसेच संबंधित बँक आणि मर्चंटकडे सातत्याने पाठपुरावा करून फसवणुकीची रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले. पोलिसांच्या या तत्पर कार्यवाहीमुळे महिलेला दिलासा मिळाला असून, तिने येरवडा पोलिसांचे आभार मानले.
अनोळखी लिंकपासून सावध राहा!
सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळावे. संशयास्पद ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करू नये तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बँकिंगविषयक गोपनीय माहिती देऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा आणि www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.







