एकता दौड, रक्तदान शिबिर, व्याख्यान, नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी
नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे महापालिकेचे आवाहन
काशिनाथ शिंदे
पिंपरी : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समिती, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ३१ ऑक्टोबर आणि रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय पर्वात एकता दौड, देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम, व्याख्यान, रक्तदान शिबिर, नाट्यप्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत निगडी येथील भक्ती-शक्ती शिल्प परिसरात एकता दौड आणि देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ५ वाजता ‘वर्तमान भारतासाठी सरदार पटेल यांच्या विचारांची प्रासंगिकता’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात ‘अपरिचित सरदार गाथा’ हा संगीतमय कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
रविवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, प्राधिकरण येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनचरित्रावर आधारित कार्यक्रम होणार आहे. तसेच सायंकाळी ६ वाजता ‘अखंड भारताचे शिलेदार, तुकडे ते राष्ट्र’ हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.
या पर्वाच्या निमित्ताने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्यावर आधारित निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. या विविध उपक्रमांतून नागरिकांना सरदार पटेल यांचे जीवनकार्य, त्यांचे विचार आणि देशाच्या एकात्मतेसाठी त्यांनी दिलेले योगदान जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय एकात्मता आणि अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करणे, तसेच त्यांचे विचार समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविणे हा या प्रबोधन पर्वाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून देशभक्ती, राष्ट्रीय एकता आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ व्हावी, अशी अपेक्षा आहे.
तरी नागरिकांनी ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’मधील विविध कार्यक्रमांत सहभागी होऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेचे क्रीडा विभागाचे उपआयुक्त पंकज पाटील यांनी केले आहे.





