‘थलाई कुथल’ प्रथम; कोल्हापूरच्या ‘समोरच्या घरात’ला द्वितीय क्रमांक
काशिनाथ शिंदे
पुणे: महावितरणच्या आंतरप्रादेशिक राज्यस्तरीय ‘नाट्यबहार’ नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडलाच्या ‘थलाई कुथल’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली, तर कोल्हापूर परिमंडलाच्या ‘समोरच्या घरात’ या नाटकाने द्वितीय क्रमांक मिळवला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पद्मावती येथे २१ व २२ ऑक्टोबर रोजी झालेल्या या दोन दिवसीय स्पर्धेचा गुरुवारी उत्साहात समारोप झाला. विविध सामाजिक विषयांवर आधारित चार नाटकांच्या सादरीकरणातून महावितरणच्या कर्मचाऱ्यांमधील अभिनय आणि कलागुणांचा उत्कृष्ट आविष्कार पाहायला मिळाला.
व्यावसायिक नाटकांना साजेशी कलाकारांची कामगिरी
महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे, कार्यकारी संचालक परेश भागवत व अंकुर कावळे, कार्यकारी संचालक तथा पुणे प्रादेशिक संचालक सुनील काकडे, नागपूर प्रादेशिक संचालक राजेश नाईक, समन्वयक तथा मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके आणि प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर उपस्थित होते. परीक्षक म्हणून राज काझी, अजय धनवे, शुभांगी पाठक आणि राज कुबेर यांनी काम पाहिले.
यावेळी मार्गदर्शन करताना राजेंद्र पवार म्हणाले की, आव्हानात्मक परिस्थितीत दैनंदिन कामांची जबाबदारी पार पाडतानाही वीज कर्मचाऱ्यांनी स्वतःमधील कलाकार आणि कलेची जपणूक केली आहे. महावितरणचे कलाकार व्यावसायिक नाटकांना साजेशी कामगिरी करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मनोगतात दिलीप जगदाळे यांनी चारही नाटकांचे सखोल विश्लेषण करत कलाकारांचे कौतुक केले. रसिक म्हणून नाट्यरूपी मेजवानीचा आनंद घेता आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
चार नाटकांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कोकण प्रादेशिक विभागाचे ‘ओल्या भिंती’ आणि पुणे प्रादेशिक विभागाचे ‘समोरच्या घरात’, तर दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगर विभागाचे ‘वारी’ आणि नागपूर प्रादेशिक विभागाचे ‘थलाई कुथल’ ही नाटके सादर झाली. सामाजिक आशय, अभिनय आणि सादरीकरणामुळे या नाटकांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या नेतृत्वाखाली पुणे परिमंडलाने स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. सुनील काकडे यांनी प्रास्ताविक केले. मृदुला शिवदे आणि भक्ती जोशी यांनी सूत्रसंचालन केले, तर उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भूपेंद्र वाघमारे यांनी आभार मानले.
स्पर्धेचा संपूर्ण निकाल
१. नाट्यनिर्मिती
प्रथम : ‘थलाई कुथल’ — नागपूर परिमंडल
द्वितीय : ‘समोरच्या घरात’ — कोल्हापूर परिमंडल
२. दिग्दर्शन
प्रथम : प्रफुल्ल लांडे — ‘थलाई कुथल’
द्वितीय : अमित बोकील — ‘समोरच्या घरात’
३. नेपथ्य
प्रथम : विठ्ठल पाटील — ‘समोरच्या घरात’
द्वितीय : प्रिती फुले — ‘थलाई कुथल’
४. प्रकाशयोजना
प्रथम : सुजाता सोनटक्के — ‘थलाई कुथल’
द्वितीय : आशिष मेहता — ‘समोरच्या घरात’
५. पार्श्वसंगीत
प्रथम : धर्मदीप फुलझेले — ‘थलाई कुथल’
द्वितीय : आशिष कासार — ‘वारी’
६. रंगभूषा व वेशभूषा
प्रथम : समिधा लोहरे — ‘थलाई कुथल’
द्वितीय : दत्तात्रय भणगे — ‘समोरच्या घरात’
७. उत्कृष्ट अभिनेता
प्रथम : जयतीर्थ सांगलीकर (श्रीरंग विजयकर) — ‘समोरच्या घरात’
द्वितीय : असित रामटेके (अण्णा) — ‘थलाई कुथल’
८. उत्कृष्ट अभिनेत्री
प्रथम : श्वेता सांगलीकर (अनुराधा) — ‘समोरच्या घरात’
द्वितीय : प्रणाली निमजे (आई) — ‘ओल्या भिंती’
९. उत्तेजनार्थ पारितोषिके
पौर्णिमा पुरोहित (कृष्णाक्का) — ‘समोरच्या घरात’
दिपाली नरवडे (सगुणा) — ‘वारी’
संगीता चव्हाण (मेघा) — ‘ओल्या भिंती’
प्रशांत मडावी (रामानुज अण्णा) — ‘थलाई कुथल’
छायाचित्र ओळ : महावितरणच्या राज्यस्तरीय ‘नाट्यबहार’ स्पर्धेत प्रथम पारितोषिक स्वीकारताना नागपूर परिमंडलाचे कलाकार.







