काशिनाथ शिंदे
मुंबईत अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मुंबई गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक्स सेलने (ANC) मोठी कारवाई केली आहे. आझाद मैदान ANC युनिटने डोंगरीतील उमरखाडी क्रॉस लेन परिसरात छापा टाकून तब्बल १ कोटी २४ लाख ७० हजार ५०० रुपये किमतीचा ३ किलो ५६३ ग्रॅम हायड्रो गांजा जप्त केला असून, दोघांना अटक केली आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या आरोपीकडून १ किलो ८२३ ग्रॅम, तर दुसऱ्या आरोपीकडून १ किलो ७४० ग्रॅम हायड्रो गांजा जप्त करण्यात आला. दोघांकडून मिळून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची अंदाजित किंमत १ कोटी २४ लाख ७० हजार ५०० रुपये आहे.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक १०१/२०२६ नुसार अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act), १९८५ मधील कलम ८(क), २०(ब) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, संयुक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले-श्रींगी आणि सहायक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
आझाद मैदान ANC युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक शैलेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली PSI राम लिंगे, सागर घाडगे, पोलीस हवालदार पाटील, प्रभु, करांडे आणि पोलीस शिपाई भोसले यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
डोंगरी परिसरातील या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांविरोधातील पोलिसांच्या मोहिमेला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.







