अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली; १७ दुचाकींसह चारचाकी वाहनांचे नुकसान
काशिनाथ शिंदे
पिंपरी : चिंचवड येथील चाफेकर चौक परिसरातील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये गुरुवारी मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी टेरेसवर अडकलेल्या सुमारे १५ नागरिकांची सुखरूप सुटका केली. जवानांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली.
या घटनेत महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच काही रुग्ण टेरेसवर अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने बचावकार्य केले आणि सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढले. दरम्यान, घटनेत जखमी झालेल्या एका व्यक्तीला उपचारासाठी तातडीने तालेरा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आगीची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्रासह प्राधिकरण, थेरगाव आणि नेहरूनगर अग्निशमन केंद्रांमधून एकूण चार अग्निशमन वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली. जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणण्यासाठी आणि अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या.
या आगीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या १७ दुचाकी, दोन चारचाकी वाहने, एक सायकल तसेच काही वायरिंग साहित्य जळून नुकसान झाले. टेरेसवर अडकलेल्या नागरिकांची सुरक्षित सुटका करणे हे अग्निशमन दलासमोरील प्रमुख आव्हान होते. मात्र, जवानांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याचे आवाहन
आगीसारखी आपत्कालीन घटना घडल्यास नागरिकांनी घाबरून न जाता शांतता राखावी. तातडीने अग्निशमन दलाच्या १०१ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून घटनेचे ठिकाण आणि परिस्थितीची स्पष्ट माहिती द्यावी. आग लागलेल्या ठिकाणी गर्दी करू नये तसेच अग्निशमन दलाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अग्निशमन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.





