यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश

समान काम-समान वेतन, विमा संरक्षण आणि मृत्यू झाल्यास २५ लाखांच्या भरपाईचीही मागणी

काशिनाथ शिंदे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील कंत्राटी व मानधनावरील कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस आणि प्रलंबित वेतन अदा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर ‘विनम्र अभियान पदयात्रा’ काढण्यात आली. या पदयात्रेनंतर महापौर रवी लांडगे यांची भेट घेऊन कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोनस वितरणाबाबत तातडीने परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले.

भिमसृष्टी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. या पदयात्रेत हजारो कामगार सहभागी झाले होते. कामगारांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

दिवाळीपूर्वी बोनस देण्याची मागणी

महापौर रवी लांडगे यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ चा बोनस आणि मासिक वेतन ३ नोव्हेंबर २०२६ पूर्वी अदा करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. महापौरांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांना बोनस वितरणाबाबत तातडीने कार्यवाही करून परिपत्रक काढण्याच्या सूचना दिल्या.

महानगरपालिकेच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या कंत्राटी व मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायदेशीररीत्या पात्रतेनुसार बोनस मिळावा, अशी भूमिका महापौरांनी घेतली. काही ठेकेदार वेतनामध्येच बोनस समाविष्ट असल्याचे सांगून स्वतंत्र बोनस देण्याचे टाळत असल्याची बाबही भोसले यांनी बैठकीत मांडली.

साडेचार हजार कर्मचाऱ्यांसाठी विविध मागण्या

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी, वाहनचालक, वैद्यकीय विभागातील स्वच्छता सेवक, वॉर्डबॉय, नर्सेस, तांत्रिक कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, उद्यान विभागातील कर्मचारी, अग्निशमन विभागातील कर्मचारी व वाहनचालक, महापालिकेच्या शाळांमधील कर्मचारी, स्मशानभूमीतील कर्मचारी तसेच पाणीपुरवठा व जलवाहिनी विभागातील कर्मचारी आणि विविध प्रभागांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे ४,५०० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे निवेदनातून लक्ष वेधण्यात आले.

See also  व्यक्तिमत्व विकासासाठी संवाद कौशल्य वाढवावे डॉ. गोविंद कुलकर्णी

या कर्मचाऱ्यांना समान कामासाठी समान वेतन द्यावे, प्रत्येक कर्मचाऱ्याचा कुटुंबासह पाच लाख रुपयांपर्यंतचा विमा उतरवावा, अपघातामुळे अथवा आजारामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना २५ लाख रुपयांची भरपाई द्यावी आणि अनुकंपा तत्त्वावर वारसदाराला महानगरपालिकेत नोकरी द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

विविध प्रश्नांवर स्वतंत्र बैठक

महापौर रवी लांडगे म्हणाले, “कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेतील सर्व पात्र कंत्राटी व मानधनावरील कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला पाहिजे. बोनससंदर्भातील परिपत्रक तातडीने काढण्यात येईल. त्यानंतर बोनस वितरणाची प्रक्रिया निश्चित करण्यात येईल.”

समान काम-समान वेतन, कर्मचाऱ्यांचे विमा संरक्षण, मानधनावर काम करणाऱ्या नर्सेसच्या विखंडित झालेल्या ठरावाचा प्रश्न तसेच कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित विषयांवर सोमवारी किंवा मंगळवारी स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल, असे आश्वासनही महापौरांनी दिल्याचे भोसले यांनी सांगितले.

कामगारांच्या वतीने आभार

यशवंतभाऊ भोसले म्हणाले, “दिवाळी बोनसच्या मागणीसाठी महापौर रवी लांडगे यांची भेट घेतली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने परिपत्रक काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. पात्र कामगारांना बोनस मिळावा, तसेच बोनस देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदारांवर योग्य कार्यवाही व्हावी, अशी आमची मागणी आहे. समान काम-समान वेतन, विमा संरक्षण आणि इतर प्रलंबित प्रश्नांवरही महापौरांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. कामगारांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.”

दरम्यान, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व विभागांतील कंत्राटदारांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत परिपत्रकाद्वारे सूचना करण्यात येणार आहेत. हे परिपत्रक गुरुवारी संध्याकाळी किंवा जास्तीत जास्त सोमवारी सकाळपर्यंत काढण्यात येईल. तसेच महापौरांच्या निर्देशानुसार इतर मागण्यांवरही स्वतंत्र बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

  • Related Posts

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली; १७ दुचाकींसह चारचाकी वाहनांचे नुकसान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : चिंचवड येथील चाफेकर चौक परिसरातील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये गुरुवारी…

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    २५ लाखांपर्यंतच्या कामांना अतिरिक्त आयुक्तांची मान्यता; त्यापुढील प्रस्तावांसाठी स्थायी समितीची पूर्वपरवानगी आवश्यक काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रात प्रभागस्तरावरील स्थानिक विकासकामांना गती देण्यासाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश

    मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर

    मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर