महावितरणची २०५ कोटी ८७ लाखांची थकबाकी ऑक्टोबरमध्ये वसूल करण्याचे निर्देश
काशिनाथ शिंदे
पुणे : वारंवार सूचना देऊनही पुणे परिमंडलातील तब्बल २०५ कोटी ८७ लाख रुपयांची थकबाकी शिल्लक राहिल्याबद्दल नाराजी व्यक्त करत, ऑक्टोबर महिन्यात चालू वीजबिलासोबत ही थकबाकी कोणत्याही परिस्थितीत वसूल करा. त्याचबरोबर वीजपुरवठ्याची गुणवत्ता आणि सातत्य कायम राखा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा महावितरणचे कार्यकारी संचालक (वाणिज्य) दिनेश अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना दिला.
महावितरणच्या पुणे परिमंडलाचे पालक संचालक म्हणून अग्रवाल दर आठवड्याला कामकाजाचा आढावा घेतात. शनिवारी (दि. ३) झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी वीजबिल वसुली, वीजपुरवठा, सेवा सेतू तसेच सेवा संकल्प अभियानाचा उपविभागनिहाय आढावा घेतला.
या बैठकीस प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, सुरेश सवाईराम, सहायक महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) कीर्ती भोसले यांच्यासह पुणे परिमंडलातील सर्व विभागांचे कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते आणि अधिकारी उपस्थित होते.
अग्रवाल यांनी सांगितले की, सप्टेंबर महिन्याअखेर पुणे परिमंडलात २०५ कोटी ८७ लाख रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. पुण्यासारख्या महत्त्वाच्या परिमंडलासाठी ही समाधानकारक बाब नाही. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या चालू बिलासोबत थकीत रक्कम वसूल करण्याची कार्यवाही तातडीने करावी. पुढील शनिवारपर्यंत थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झाले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
ऑक्टोबर महिन्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठ्याबाबतही विशेष दक्षता घेण्याच्या सूचना अग्रवाल यांनी दिल्या. प्रत्येक कार्यक्षेत्रात वीजपुरवठा अखंडित आणि दर्जेदार राहील, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच वीजगळती रोखून महावितरणचा महसूल वाढविण्यासाठी प्रभावी कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.
ग्राहकसेवेला प्राधान्य द्या
सेवा सेतू आणि सेवा संकल्प अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही अग्रवाल यांनी दिल्या. ग्राहकांना महावितरणच्या विविध सेवांचा सहज लाभ मिळावा यासाठी जास्तीत जास्त किऑस्क उभारावेत, तसेच ग्राहकांपर्यंत सेवा पोहोचविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक सक्रिय राहावे, असे त्यांनी स्पष्ट केले






