२२ केव्ही सीटी-ब्रेकरमध्ये स्फोट; पिंपरी-चिंचवडसह वाकड, रावेत, काळेवाडी, सांगवी परिसरातील वीजपुरवठ्यावर मोठा परिणाम
काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड, महापारेषण कंपनीच्या चिंचवड येथील २२० केव्ही अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाड होऊन अचानक आग लागली. उपकेंद्रातील २२ केव्ही सीटी व ब्रेकरमध्ये स्फोट झाल्याने मोठ्या प्रमाणात आगीचा भडका उडाला. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या बहुतांश भागातील वीजपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला.
दुपारी सुमारे १२.२५ वाजता ही घटना घडली. स्फोटानंतर उपकेंद्रात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसून आल्या. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना सुरू केल्या. सध्या आग नियंत्रणात आली असून, बिघाड झालेला भाग सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आला आहे.
या उपकेंद्रातून महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या अनेक २२ केव्ही उच्चदाब वाहिन्या बाधित झाल्याने शहरातील विविध भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. पिंपरी-चिंचवड शहरासह पिंपरी-चिंचवड प्राधिकरण, रावेत, काळेवाडी, वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, सांगवी, पुनावळे, ताथवडे तसेच लगतच्या परिसराला या बिघाडाचा फटका बसला.
दरम्यान, महापारेषणकडून बिघाड झालेला भाग वगळून उपकेंद्रातील उर्वरित यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे, महावितरणकडूनही पर्यायी वीजपुरवठ्याच्या मार्गाने शक्य तितक्या लवकर वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक, व्यावसायिक आस्थापना तसेच औद्योगिक क्षेत्राला मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. बिघाड नेमका कशामुळे झाला, याबाबत तांत्रिक तपासणी करण्यात येत आहे.







