विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, तज्ज्ञांसह परीक्षा यंत्रणांकडून सूचना मागविल्या
काशिनाथ शिंदे
पुणे, राज्यातील भरती परीक्षांची पद्धत अधिक पारदर्शक, सुरक्षित, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. या समितीच्या माध्यमातून विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, शैक्षणिक संस्था, परीक्षा यंत्रणा, विषयतज्ज्ञ तसेच संबंधित घटकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अनुभव आणि अपेक्षा जाणून घेण्यात येणार आहेत.
या उपक्रमांतर्गत पुणे विभागीय सल्लामसलत १२ सप्टेंबर २०२६ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आली आहे. सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणाऱ्या या सल्लामसलतीत भरती परीक्षा प्रक्रियेतील विविध अडचणी आणि सुधारणांच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात येणार आहे.
विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा उमेदवारांसह शैक्षणिक संस्था, परीक्षा प्रक्रियेशी संबंधित यंत्रणा, विषयतज्ज्ञ आणि अन्य संबंधित घटकांना या चर्चेत सहभागी होता येणार आहे. भरती परीक्षेतील विविध टप्प्यांदरम्यान आलेले अनुभव, अडचणी, अपेक्षा तसेच परीक्षा पद्धतीत आवश्यक असलेल्या सुधारणांबाबत सूचना मांडण्याची संधी सहभागी घटकांना मिळणार आहे.
प्रश्नपत्रिका ते तक्रार निवारणापर्यंत चर्चा
प्रश्नपत्रिका तयार करणे व परीक्षा केंद्रांचे व्यवस्थापन, परीक्षा प्रक्रियेची सुरक्षितता व विश्वासार्हता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, उमेदवारांशी संवाद, तक्रार निवारण व्यवस्था, परीक्षा देतानाचा उमेदवारांचा अनुभव यासह भरती परीक्षा पद्धतीशी संबंधित अन्य महत्त्वाच्या विषयांवरही सल्लामसलतीत चर्चा करता येणार आहे.
पुणे महसूल विभागातील सल्लामसलत प्रक्रियेच्या समन्वयासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे स्वतंत्र समन्वय कक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहे.
११ सप्टेंबरपर्यंत सूचना पाठविण्याचे आवाहन
विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्था, विषयतज्ज्ञ आणि अन्य संबंधित घटकांनी आपल्या सूचना व अभिप्राय ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत Pune-ExamReformsTaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठवावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्राप्त सूचना तसेच प्रत्यक्ष संवादासाठी आलेल्या विनंत्यांचा आढावा घेऊन सल्लामसलतीचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार संबंधित व्यक्ती व संस्थांना चर्चेसाठीची वेळ कळविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
भरती परीक्षांची प्रक्रिया अधिक सक्षम, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी या सल्लामसलतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.







