२५ वर्षांपासून अखंड रक्तदान सेवा; ५१व्या वाढदिवशी मिलिंद दाभोळकर यांचे २६वे रक्तदान
काशिनाथ शिंदे
पिंपरी : वाढदिवस म्हटला की उत्सव, शुभेच्छा आणि आनंदाचे क्षण आलेच; मात्र या आनंदाला सामाजिक बांधिलकीची जोड देत गेल्या २५ वर्षांपासून रक्तदानाची अखंड सेवा करणाऱ्या मिलिंद दाभोळकर यांनी आपल्या ५१व्या वाढदिवशीही रक्तदान करून माणुसकीचा आदर्श घालून दिला. दि. ३ सप्टेंबर रोजी वायसीएम रुग्णालयाच्या रक्तपेढीत त्यांनी २६वे रक्तदान केले.
वाढदिवसाचा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता एखाद्या गरजू रुग्णाच्या जीवनासाठी रक्तदान करण्याची दाभोळकर यांची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमातून रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित होत असून, तरुणांसह नागरिकांनीही रक्तदानासाठी पुढे यावे, असा प्रेरणादायी संदेश यातून मिळत आहे.
मिलिंद दाभोळकर हे कोकण जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष असून, चिखली साने चौक वृत्तपत्र एजन्सीचे प्रोप्रायटर आहेत. सामाजिक कार्याची आवड जोपासताना त्यांनी गेल्या २५ वर्षांत नियमित रक्तदानाची सेवा सुरू ठेवली आहे. विशेष म्हणजे स्वतःच्या वाढदिवशी रक्तदान करण्याची त्यांची परंपरा समाजासाठी अनुकरणीय ठरत आहे.
दाभोळकर यांच्या या उपक्रमाला प्रोत्साहन देत सामाजिक कार्यकर्ते पोपट आरणे यांनीही त्यांच्या वाढदिवसानिमित्त वायसीएम रुग्णालयात रक्तदान केले.
यावेळी वायसीएम रक्तपेढीच्या डॉ. नीता घाडगे, तंत्रज्ञ प्रियंका खानविलकर, सुधीर माळी, दत्तराज सागरे तसेच पोपट आरणे आदी उपस्थित होते. राजेंद्र साळवी, सत्यम साळवी, अवधूत कदम यांच्यासह मित्रपरिवाराने दाभोळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या २५ वर्षांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
“वाढदिवशी स्वतःसाठी काही घेण्यापेक्षा एखाद्याचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान करणे, हाच खरा आनंद आणि माणुसकीचा उत्सव आहे,” हा संदेश दाभोळकर यांच्या उपक्रमातून समाजासमोर आला आहे.







