आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास
चिखली : जुन्या आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून तरुणावर पिस्तूलातून गोळीबार करून त्याला गंभीर जखमी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना चिखलीतील जाधववाडी परिसरात घडली. या प्रकरणी चिखली पोलिसांनी स्वप्नील कांताराम जाधव (वय ३७), रोशन पिंगळे (वय २८) आणि समीर जाधव अशा तिघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ही घटना १४ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री सव्वादोन ते अडीचच्या सुमारास ओलिओ हॉटेल, सिटी प्राईड स्कूलजवळ, जाधववाडी, चिखली येथे घडली. याप्रकरणी रवी धनाजी घोगरे (वय २६, रा. जाधववाडी, चिखली, सध्या भोसरी एमआयडीसी परिसर) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवी घोगरे हे ओलिओ हॉटेलजवळ आले असता त्यांचा ओळखीचा स्वप्नील जाधव हा चालक रोशन पिंगळे याच्यासह तेथे उपस्थित होता. जुन्या आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून फिर्यादी आणि स्वप्नील जाधव यांच्यात वाद झाला. वाद वाढल्यानंतर स्वप्नील जाधव याने फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली आणि जवळील पिस्तूलातून त्याच्या दिशेने एक गोळी झाडल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले.
गोळीबारात रवी घोगरे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले लोखंडी पिस्तूल, गोळी, आरोपींनी वापरलेले वाहन आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल फडतरे करीत आहेत.
या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६६५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९(१), ३(४), शस्त्रासंबंधी कलम ३(२५), ३(२७) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






