कुंजीर चौकातील राजमाता जिजाऊ उद्यानाशेजारील शौचालयाची दुरवस्था; दोन दिवसांत सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
काशिनाथ शिंदे
पिंपरी: कुंजीर चौक येथील राजमाता जिजाऊ उद्यानाशेजारील सार्वजनिक शौचालय गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याने परिसरातील नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. शौचालयाच्या परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून, नागरिकांसाठी असलेल्या या मूलभूत सुविधेची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षाचा निषेध करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी तोंडावर हात ठेवून मूक निषेध नोंदविला.
शौचालयाच्या इमारतीतील गाळ्यांचा अनधिकृत वापर होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. ई-सेवा केंद्रासाठी असलेल्या गाळ्यात पंचर काढण्याचा व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे आणि उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संबंधित ठेकेदार सुबोध ठाकूर यांच्याकडे शौचालय दोन वर्षांपासून बंद ठेवण्याबाबत जाब विचारण्यात आला.
शौचालय बंद ठेवण्याबाबत कधी पाणी नसल्याचे, तर कधी वीज नसल्याचे कारण सांगितले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकांनी संताप व्यक्त केला.
यावेळी शौचालय तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली. दोन दिवसांत शौचालय नागरिकांच्या सेवेत सुरू न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने देण्यात आला.
भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे आणि नगरसेविका अनिताताई संदीप काटे यांच्या सहकार्याने हा प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी कुंदाताई भिसे प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांकडे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून बंद असलेले सार्वजनिक शौचालय नागरिकांच्या सेवेत सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली.






