५ कामांच्या करारासाठी लाचेची मागणी; १९ हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील मुख्य अभियंता प्रमोद सुधाकर ओभासे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाचप्रकरणी ताब्यात घेतले आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील पाच कामांच्या करारावर सह्या करण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे. या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदाराचे वय ५७ वर्षे असून, त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची पाच कामे मिळवली होती. या कामांच्या करारावर सह्या करण्यासाठी तत्कालीन अधीक्षक अभियंता अजय सूर्यवंशी आणि त्यानंतर मुख्य अभियंता प्रमोद ओभासे यांनी निविदा रकमेच्या ०.५ टक्के प्रमाणे ४५ हजार ७८५ रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या तक्रारीच्या अनुषंगाने ११ जून २०२६ रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत, ३८ लाख रुपयांच्या निविदा रकमेच्या ०.५ टक्के प्रमाणे १९ हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने म्हटले आहे.
या प्रकरणी २९ ऑक्टोबर २०२६ रोजी संत तुकाराम नगर पोलीस ठाणे, पिंपरी-चिंचवड येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७९/२०२६ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी मुख्य अभियंता प्रमोद सुधाकर ओभासे यांना दुपारी ३ वाजता ताब्यात घेण्यात आल्याची माहिती प्रेस नोटमध्ये देण्यात आली आहे.
या कारवाईत पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक निता मिसाळ यांनी सापळा अधिकारी म्हणून काम पाहिले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांबाबत न्यायालयीन प्रक्रियेत अंतिम निष्कर्ष निघेपर्यंत संबंधित व्यक्तीला दोषी ठरवता येणार नाही.





