१ ते २० नोव्हेंबरदरम्यान राज्यभर विशेष तपासणी मोहीम; प्रवाशांची लूट रोखण्यासाठी परिवहन विभाग सज्ज
विनोद वरखडे प्रतिनिधी पिंपरी
पिंपरी-चिंचवड : दिवाळी सणानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन खासगी कंत्राटी बसमालकांकडून केली जाणारी मनमानी भाडेवसुली रोखण्यासाठी परिवहन विभागाने कंबर कसली आहे. १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या बसमालक आणि चालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांनी दिला आहे.
शासनाच्या नियमानुसार खासगी कंत्राटी बसचे भाडे हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) त्याच मार्गावरील टप्पा वाहतुकीच्या प्रति किलोमीटर भाडेदराच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असता कामा नये. त्यामुळे खासगी बसचालकांनी प्रवाशांकडून निर्धारित मर्यादेतच भाडे आकारणे बंधनकारक आहे.
जादा भाडे आकारल्यास तक्रार करा!
खासगी बसमालकांकडून निर्धारित दरापेक्षा जास्त भाडे आकारले जात असल्यास प्रवाशांनी नजीकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखी तक्रार करावी. तसेच पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या dyrto.14-mh@gov.in या ई-मेलवरही तक्रार नोंदविता येणार आहे. तक्रारीसोबत प्रवाशाचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, वाहन क्रमांक आणि तिकिटाचा छायाचित्र पुरावा पाठविणे आवश्यक आहे.
वाहनांची कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याचे निर्देश
खासगी बसमालक आणि चालकांनी वाहनाचा परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, विमा, योग्यता प्रमाणपत्र, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र तसेच चालकाचा वाहन परवाना अद्ययावत ठेवावा. बसच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेणे किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे आढळल्यास संबंधित मालक व चालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
दिवाळीच्या गर्दीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी परिवहन विभाग विशेष दक्षता घेणार आहे. प्रवाशांनीही जादा भाडे आकारणी होत असल्यास पुराव्यासह तक्रार करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांनी केले आहे.






