रस्ते, आरोग्य, स्वच्छतागृहे आणि नागरी सुविधांच्या कामांना मंजुरी; शहरातील पायाभूत सुविधा बळकट होणार
काशिनाथ शिंदे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी महानगरपालिकेच्या स्थायी समितीने विविध महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. रस्त्यांचे डांबरीकरण, पदपथांची उभारणी, नाल्यांची दुरुस्ती, रुग्णालयांतील यंत्रणांची देखभाल, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि विविध नागरी सुविधांच्या कामांचा यात समावेश आहे. त्यामुळे शहरातील विविध प्रभागांमध्ये विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे.
महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात स्थायी समितीची साप्ताहिक सभा नुकतीच पार पडली. या सभेत शहरातील विविध भागांतील विकासकामांच्या निविदा, देखभाल-दुरुस्ती आणि प्रशासकीय खर्चाच्या प्रस्तावांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली.
तालेरा आणि वायसीएम रुग्णालयाला प्राधान्य
चिंचवड येथील तालेरा रुग्णालयातील वातानुकूलन यंत्रणा (HVAC), शस्त्रक्रिया कक्ष (OT) आणि विद्युत यंत्रणेचे पुढील दोन वर्षे संचालन, देखभाल व दुरुस्ती करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) क्ष-किरण विभागातील डिजिटल रेडिओग्राफी यंत्रणेच्या हमी कालावधीनंतर देखभालीसाठी मूळ उत्पादक कंपनीसोबत करार करण्यास मंजुरी देण्यात आली.
रस्ते विकास आणि डांबरीकरणाला गती
प्रभाग क्रमांक १६ मधील रावेत परिसरातील ताब्यात आलेले विकास आराखड्यातील आणि इतर रस्ते विकसित करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्रमांक २२ मधील पवनानगर आणि आदर्शनगर परिसरातील रस्त्यांचे सन २०२६-२७ या वर्षात गरम डांबरीकरण करण्याचा प्रस्तावही मंजूर झाला.
याशिवाय धावडेवस्ती, गुळवेवस्ती, कासारवाडी, संत तुकारामनगर, विशाल थिएटर परिसर, एमआयडीसी तसेच विविध प्रभागांतील रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण, पावसाळी पाण्याच्या वाहिन्या आणि नाल्यांच्या दुरुस्तीची कामे मार्गी लागणार आहेत.
पदपथ, स्वच्छतागृहे आणि नागरी सुविधांचा विकास
प्रभाग क्रमांक १५ मधील आकुर्डी गावठाण परिसरात पावसाळी पाण्याच्या वाहिन्या, पदपथ आणि इतर स्थापत्य कामे करण्यास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्रमांक ९ मध्ये पदपथांची उभारणी, नेहरूनगर व विठ्ठलनगर परिसरातील स्थापत्य कामे, तर प्रभाग क्रमांक १० मधील शाहूनगर येथे रस्त्यालगतच्या सुविधांची कामे मंजूर करण्यात आली.
दिघी-बोपखेल, चोविसावाडी, वडमुखवाडी, मोशी, डुडूळगाव आणि इतर भागांतील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, रस्त्यांची दुरुस्ती आणि दिशादर्शक फलक उभारण्याच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली.
दफनभूमी आणि इतर सुविधांनाही दिलासा
दापोडी, निगडी आणि दिघी येथील पाच मुस्लिम व लिंगायत दफनभूमींच्या देखभालीसाठी नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधित संस्थांना किमान वेतन दरानुसार एक महिन्याची मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच प्रभाग क्रमांक १६, १७, १८ आणि २२ मधील वाहन, इंधन व चालकासह रिक्षा-टेम्पो व्यवस्थेला नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आठ महिन्यांची मुदतवाढ मंजूर करण्यात आली.
शैक्षणिक आणि प्रशासकीय सुविधांनाही मंजुरी
सांगवी येथील महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी दृश्याधारित शिक्षण आणि आभासी प्रयोगशाळा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ई-लर्निंग प्रस्तावाचे अवलोकन करण्यात आले. महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कासारवाडी येथे अतिवृष्टीमुळे आवश्यक साहित्याच्या तातडीच्या खरेदीस मंजुरी देण्यात आली.
याशिवाय ‘ड’ आणि ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध कार्यक्रमांसाठी ध्वनिक्षेपण, सीसीटीव्ही, जनरेटर व प्रकाशव्यवस्थेच्या निविदा मंजूर करण्यात आल्या. महापालिका इमारतींची दुरुस्ती, फर्निचर आणि देखभाल कामांनाही मान्यता देण्यात आली. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनासंदर्भातील प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली.
स्थायी समितीच्या या निर्णयांमुळे शहरातील विविध प्रभागांमधील रस्ते, आरोग्य, स्वच्छता आणि नागरी सुविधांच्या कामांना चालना मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.






