जर्मनीत जाण्याची मिळाली सुवर्णसंधी; पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात मानाचा तुरा
काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड : नवी दिल्ली येथे झालेल्या १२ व्या ‘इन्स्पायर मानक’ राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात आपल्या वैज्ञानिक प्रकल्पाच्या जोरावर देशातील सर्वोत्कृष्ट सात बालवैज्ञानिकांमध्ये स्थान मिळविणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या कु. गीता गणपत धनवडे हिने शहराचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर उंचावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते तिचा विशेष सत्कार करण्यात आला.
माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या गीताने १२ ते १४ ऑक्टोबरदरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात आपल्या प्रकल्पाचे प्रभावी सादरीकरण केले. तिच्या कल्पकतेची आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची दखल घेत देशातील सर्वोत्कृष्ट सात बालवैज्ञानिकांमध्ये तिची निवड करण्यात आली. या यशाच्या जोरावर तिला जर्मनी येथे जाण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.
यावेळी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुलदीप जंगम, तसेच अन्य पदाधिकारी, नगरसदस्य आणि अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
गीताने मिळविलेल्या या यशामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक क्षेत्रातील लौकिकात भर पडली आहे. तिच्या जिद्दीचे, मेहनतीचे आणि संशोधनवृत्तीचे कौतुक करत उपमहापौर शर्मिला बाबर यांनी तिचे अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक व वैज्ञानिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.






