प्रथम क्रमांकासाठी ५१ हजारांचे पारितोषिक; महापौर रवी लांडगे यांचे शिवप्रेमींना सहभागी होण्याचे आवाहन
काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड : छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, गड-किल्ल्यांची परंपरा आणि महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि सेवा सारथी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महापौर चषक भव्य किल्ले बनवा स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. महापौर रवी लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघाला तब्बल ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या स्पर्धेत शहरातील शिवप्रेमी, किल्लेप्रेमी, गृहनिर्माण सोसायट्या आणि तरुण मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी ५१ हजार, द्वितीय क्रमांकासाठी ३५ हजार, तृतीय क्रमांकासाठी २१ हजार, चतुर्थ क्रमांकासाठी ११ हजार, पाचव्या क्रमांकासाठी १० हजार आणि सहाव्या क्रमांकासाठी ७ हजार रुपये देण्यात येणार आहेत. याशिवाय विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
या स्पर्धेत प्रत्येक गृहनिर्माण सोसायटी किंवा विंगमधून एक किल्ला साकारता येणार आहे. प्रत्येक संघात जास्तीत जास्त पाच सदस्य असणे आवश्यक आहे. किल्ल्याची ऐतिहासिक माहिती, नैसर्गिक साहित्याचा वापर, कलात्मक मांडणी आणि सामाजिक जनजागृतीचा संदेश या निकषांवर परीक्षण केले जाणार आहे. विशेष म्हणजे, स्पर्धेसाठी नावनोंदणी पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आली आहे.
२ नोव्हेंबरला किल्ल्यांचे परीक्षण
२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून किल्ल्यांचे परीक्षण करण्यात येणार असून, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ पुस्तकांपुरता मर्यादित न राहता तो प्रत्येक घरात, प्रत्येक सोसायटीत आणि नव्या पिढीच्या मनामनात रुजावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. किल्ले उभारण्याच्या माध्यमातून मुलांमध्ये इतिहासाची आवड, देशभक्तीची भावना आणि महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाविषयी अभिमान निर्माण व्हावा, असा आयोजकांचा प्रयत्न आहे.
या स्पर्धेची संपूर्ण माहिती सेवा सारथी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ओंकार गंगाधर मांडगे यांनी दिली. महापौर रवी लांडगे आणि सेवा सारथी फाउंडेशनच्या सदस्यांनी शहरातील नागरिकांना या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे.
स्पर्धेचे घोषवाक्य : किल्ले घडवूया, इतिहास जपूया, देशभक्ती वाढवूया!
नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :
सेवा सारथी : ७३५००४६६२५
कार्तिक चव्हाण : ७२७६३५८७०३
आदर्श बोर्सुने : ७२४९६८४८१८
ओंकार मांडगे : ८४२१८४६६२५
स्वरूप कबाडे : ८३९००८७३१२
आयोजक : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि सेवा सारथी फाउंडेशन.






