सह आयुक्त मनोज लोणकर यांच्या हस्ते सत्कार; प्रदीर्घ सेवेबद्दल मान्यवरांकडून कृतज्ञता व्यक्त
काशिनाथ शिंदे
पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून ऑक्टोबर २०२६ अखेर एकूण १७ अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले. यामध्ये नियत वयोमानानुसार निवृत्त झालेल्या १६ आणि स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या सर्वांचा महानगरपालिकेच्या वतीने सह आयुक्त मनोज लोणकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत मधुकर पवळे सभागृहात हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना सह आयुक्त मनोज लोणकर म्हणाले की, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या अनुभवातून, कौशल्यातून आणि समर्पित भावनेतून शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या प्रदीर्घ सेवेमुळे महापालिकेच्या कामकाजाला बळ मिळाले असून, त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य निरोगी, आनंदी आणि समाधानी जावो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
या कार्यक्रमास मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, संगणक अधिकारी उज्वला गोडसे, लघुलेखक सुनीता पळसकर, मनिषा कामथे, कर्मचारी महासंघाच्या उपाध्यक्षा सुप्रिया सुरगुडे यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी आणि सेवानिवृत्तांचे कुटुंबीय उपस्थित होते.
हे अधिकारी-कर्मचारी झाले सेवानिवृत्त
नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये उपअभियंता (स्थापत्य) विकास घारे, लघुलेखक (उच्चस्तर) वैशाली गायकवाड, सहाय्यक प्रशासन अधिकारी रजिया खान, कार्यालय अधीक्षक सरिता मारणे, मनोज शिंदे, सिस्टर इनचार्ज हेमलता लेंभे, बबीता वळसे, विद्युत मोटार पंप ऑपरेटर राजेंद्र भुरे, शिपाई वनिता क्षीरसागर, रायन्ना अनमोल, मजूर नजमुल्ला सिध्दकी, चंद्रकांत जगताप, सुधीर वडमारे, भालचंद्र राव, काळूराम वाघमारे आणि अशोक शेलार यांचा समावेश आहे.
तर स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या सिस्टर इनचार्ज कमला गायकवाड यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ सेवेबद्दल या सोहळ्यात कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.






