‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ व ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’तील कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह ‘हाऊसफुल्ल’
काशिनाथ शिंदे
पिंपरी : संतवाणीतील भक्तिभावापासून पोवाड्याच्या जोशापर्यंत, लावणीच्या ठेक्यापासून भारूडाच्या सामाजिक आशयापर्यंत आणि ओव्यांच्या भावविश्वापासून पंढरीच्या विठ्ठलापर्यंतचा सुरेल प्रवास ‘अंतर्नाद – अ जर्नी टू द सोल’ या नाट्य-संगीतमय आविष्कारातून रसिकांना अनुभवायला मिळाला. मराठी लोकसंस्कृतीच्या विविध रंगांची सुरेल उधळण करणाऱ्या या कार्यक्रमाने उपस्थितांना अंतर्मुख केले.
अभिजात मराठी भाषेचा जागर घडविण्यासह मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ आणि ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मोरया थिएटर्सच्या वतीने ‘अंतर्नाद – अ जर्नी टू द सोल’ हा नाट्य-संगीतमय आविष्कार सादर करण्यात आला. मराठी संतपरंपरा, लोकसंगीत, भक्तिरस आणि महाराष्ट्राच्या लोकजीवनातील विविध रंगांची सुरेल गुंफण या कार्यक्रमातून करण्यात आली.
‘विठ्ठल माझा मला पावला का…’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पालखी सोहळा, गवळण, पोवाडा, दिंडीचे वर्णन करणारे गीत, गोंधळ अशा विविध सादरीकरणांनी कार्यक्रमात रंग भरला. पुढे रॅप, लावणी, पिंगळा, रिंगण आणि भारूड अशा विविध कलाप्रकारांतून मराठीच्या बोलीभाषा, लोकपरंपरा आणि समृद्ध संगीतविश्वाचे दर्शन घडविण्यात आले.
संतपरंपरेतील भक्तिरस, लोककलेतील उत्स्फूर्तता आणि मराठी मातीतील सांस्कृतिक वैविध्य यांचा सुरेल संगम या आविष्कारातून साधण्यात आला. शब्दांना सूर, सुरांना भाव आणि भावनांना लोकसंस्कृतीची समृद्ध किनार लाभल्याने ‘अंतर्नाद’ हा अभिजात मराठी भाषेच्या सांस्कृतिक वैभवाचा अनुभव देणारा कार्यक्रम ठरला.
कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रेक्षागृहातील सर्व आसने भरून गेल्याने कार्यक्रमाला ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद लाभला. कलाकारांच्या सादरीकरणाला टाळ्यांच्या कडकडाटात दाद देत रसिकांनी अभिजात मराठी भाषेच्या जागरात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
पारंपरिक वाद्यांच्या निनादात मराठी संस्कृतीचा जागर; तरुणाईने धरला ताल!
सनई, हलगी, संबळ आदी पारंपरिक वाद्यांच्या निनादात ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’चा उत्साहपूर्ण शुभारंभ करण्यात आला. सकाळपासूनच पारंपरिक वाद्यांच्या सुरांनी परिसरात मराठी संस्कृतीचा जागर अनुभवायला मिळाला.
ताशाकिंग सिराजभाई यांच्या ताशा वादनाने वातावरणात उत्साह निर्माण झाला. त्यानंतर पारंपरिक गीतांवर संबळ वादन करण्यात आले. हलगीच्या तालातून महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील जोश आणि उत्स्फूर्ततेचे दर्शन घडले. ताशा, संबळ, हलगी आणि बँडच्या ताल-सुरांनी सप्ताहाच्या शुभारंभाला लोककलेचा अनोखा रंग लाभला.
यावेळी बँड पथकाने ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्राच्या अस्मितेचा जागर करणाऱ्या गीताचे उत्साहपूर्ण सादरीकरण केले. या सादरीकरणाने उपस्थितांमध्ये उत्साह संचारला. तरुणाईनेही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत ताल धरत जल्लोष केला. कलाकारांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद देत सप्ताहाच्या शुभारंभाचा आनंद द्विगुणित केला.
रविवार, ४ ऑक्टोबरला विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९ वाजता : अथर्व थिएटर, चिंचवड यांची ‘भिरभिर’ ही एकांकिका
सकाळी १० वाजता : अस्मिता युवा मंच, पुणे यांची ‘इन दि नेम ऑफ’ ही एकांकिका
दुपारी १२.३० वाजता : संकर्षण कऱ्हाडे अभिनीत ‘नियम व अटी लागू’ हे नाटक
सायंकाळी ५ वाजता : ‘धरित्रीच्या लेकी’
रात्री ९.३० वाजता : ‘द फोक महाराष्ट्र – ओळख माझ्या महाराष्ट्राची’ हा महाराष्ट्राच्या लो
ककलेचा भव्य सोहळा
या सर्व कार्यक्रमांना मोफत प्रवेश असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिजात मराठी भाषा सप्ताहातील सांस्कृतिक उपक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







