वापरात नसलेल्या सुस्थितीतील वस्तू कचऱ्यात टाकण्याऐवजी गरजूंना द्या; महापालिका आणि स्वच्छ संस्थेचा संयुक्त उपक्रम
काशिनाथ शिंदे
पिंपरी : दिवाळीच्या सणानिमित्त घराघरांत होणाऱ्या साफसफाईत वापरात नसलेल्या, मात्र सुस्थितीत असलेल्या वस्तू आता गरजूंच्या उपयोगी येणार आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग आणि स्वच्छ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी ‘आर.आर.आर. (रिड्यूस, रीयूज, रिसायकल) कलेक्शन ड्राइव्ह’ राबविण्यात येणार आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ही मोहीम होणार आहे.
दिवाळीच्या साफसफाईदरम्यान अनेक घरांमध्ये कपडे, पुस्तके, शैक्षणिक साहित्य, खेळणी, भांडी, चादरी, पडदे, फर्निचर आणि वापरण्यायोग्य इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजूला काढल्या जातात. या वस्तू थेट कचऱ्यात न टाकता त्यांचा पुनर्वापर व्हावा आणि त्या गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचाव्यात, हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे.
‘वस्तूंचा पुनर्वापर करा, पर्यावरणाचे रक्षण करा!’
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. वापरण्यायोग्य वस्तूंचा पुनर्वापर केल्याने कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यासोबतच पर्यावरणावरील ताणही कमी होण्यास मदत होते. स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक शहर घडविण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनीही घरातील वापरात नसलेल्या, परंतु सुस्थितीत असलेल्या वस्तू संकलन मोहिमेत जमा करण्याचे आवाहन केले आहे. वस्तूंचा अपव्यय टाळणे, कचऱ्याचे प्रमाण कमी करणे आणि गरजू नागरिकांना उपयुक्त साहित्य उपलब्ध करून देणे, यासाठी या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे त्यांनी सांगितले.
३१ ऑक्टोबर रोजी येथे होणार वस्तू संकलन
रेनबो व्हिस्टा, आहेरनगर; सिद्धिविनायक विंड चाइम, रहाटणी; द वुड्स, वाकड; अक्षर एलिमेंटा व पॅलॅडिओ अपार्टमेंट, ताथवडे; द्वारका सनक्रेस्ट फेज १ व यश संकुल, पिंपळे सौदागर; ओमेगा पॅराडाइज, होरायझन्स ॲट वाकड व ला मेलोसा, वाकड; भूमी ओराबेल, सेलेस्टियल सोसायटी फेज २, राजलक्ष्मी ग्रीन्स सोसायटी, उदय हिलटॉप रेसिडेन्सी, संत ज्ञानेश्वर उद्यान व चंद्रभागा कॉर्नर, रावेत; तसेच रेणुका पंचतत्त्व, ताथवडे येथे वस्तू संकलन केले जाणार आहे.
१ नोव्हेंबर रोजी येथे राबविणार मोहीम
वुड्सव्हिल फेज १, फेज २ व फेज ३, लोटस नंदवन फेज १, कुमार प्रिन्सव्हिल फेज १ आणि सेंट्रल पार्क रेसिडेन्सी, मोशी; रिव्हर रेसिडेन्सी फेज ३, चिखली; ऐश्वर्यम, आकुर्डी; गोखले वृंदावन, चिंचवड; ट्युलिप इन्फिनिटी वर्ल्ड, पुनावळे; मिलेनियम पॅसिफिक; वसंत ॲव्हेन्यू, ताथवडे; निसर्ग किरण, रहाटणी; गंगा स्काइज सोसायटी; वल्लभनगर, पिंपरी आणि कुमार प्रथम, मोशी येथे वस्तू संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
या मोहिमेत सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहिती मिळविण्यासाठी नागरिकांनी ७०३०९०१९९३ किंवा ९१६८६८४६७० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
दिवाळीचा आनंद इतरांसोबत वाटून घेताना सामाजिक बांधिलकी जपण्याची संधी या उपक्रमातून नागरिकांना मिळणार आहे. वापरण्यायोग्य वस्तू गरजूंपर्यंत पोहोचवून कचरा कमी करण्यास आणि पर्यावरण संवर्धनास हातभार लावण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






