काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड : क्रीडा संकुलातील साफसफाई आणि टेनिस नेट बांधण्याचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर दुसरा कामगार जखमी झाला. ही घटना १८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी, चिंचवड येथील Solaris Sports And Leisure Clubs Pvt. Ltd. येथे घडली. याप्रकरणी २७ ऑक्टोबर रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सिकंदर युनूस शेख (वय ५९, रा. कोथरूड, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार गुलाम मोहम्मद सोनू शेख (वय ३८, रा. चिखली, पिंपरी-चिंचवड; मूळ गाव उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६(१) आणि १२५(अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी समीर सैफी आणि सुभान सैफी हे कामगार उंचीवरील पत्र्यांची साफसफाई तसेच टेनिस नेट बांधण्याचे काम करत होते. या कामासाठी आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून दिलेली असतानाही त्यांचा सुरक्षित वापर सुनिश्चित न करणे आणि आवश्यक खबरदारी न घेता काम सुरू ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
कामादरम्यान समीर सैफी हा शिडीवरून खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच शिडी धरून उभ्या असलेल्या सुभान सैफी याच्या हातालाही दुखापत झाली. जखमी समीर याला निगडी येथील स्नोबेल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र सायंकाळी ७ वाजून ५८ मिनिटांनी त्याचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेमुळे कामाच्या ठिकाणी सुरक्षा साधनांचा योग्य वापर आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी घेण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.






