पंतप्रधान नरेंद्र मोदी व कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जैन संघटनेच्या शाळेत चित्रकला उपक्रम
काशिनाथ शिंदे
पिंपरी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर राबविण्यात आलेल्या ‘स्वप्नातला भारत’ या संकल्पनेतून भारतीय जैन संघटनेच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी विशेष चित्रकला उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी संत तुकाराम नगरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला.
या उपक्रमात शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या कल्पनेतील भारत चित्रांच्या माध्यमातून साकारला. विकसित, सक्षम, स्वावलंबी आणि प्रगत भारताचे स्वप्न विद्यार्थ्यांनी विविध चित्रांमधून मांडले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि कलागुणांना या उपक्रमातून व्यासपीठ मिळाले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त लाडू-चिवडा तसेच अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेचे प्राचार्य देशमुख सर, उपप्राचार्य जाधव सर, यादव सर, भारतीय जनता पक्षाचे कोअर कमिटी सदस्य सदाशिवराव खाडे, माजी नगरसेवक तथा भाजप महिला मोर्चाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सुजाताताई पालांडे, मंगेश धाडगे, महेंद्र बाविस्कर, अभय फाळके, राहुल खाडे, अमोल घोरपडे, दीपक पाटील, दिनेश पाटील, जयदेव अक्कलकोटे, तात्याराव गायकवाड, राहुल शितोळे आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कामगारनेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले, “उद्याचा भारत म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात. भारताचे नाव जागतिक स्तरावर उंचावण्यासाठी तुम्हीही मोठे ध्येय ठेवले पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून दिली आहे. त्याचप्रमाणे तुम्हीही भविष्यात मोठे होऊन देशाची मान जगात उंच करा.”
दहावीच्या विद्यार्थ्यांना आगामी परीक्षेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच सदाशिवराव खाडे, सुजाताताई पालांडे आणि प्राचार्य देशमुख सर यांनी यशवंतभाऊ भोसले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत विद्यार्थ्यांच्या चित्रकला उपक्रमाचे कौतुक केले.
‘स्वप्नातला भारत’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देतानाच देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नव्या पिढीमध्ये सकारात्मक विचार रुजविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला






