जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक; सोलापूरच्या विभागीय स्पर्धेत चमकणार शहराचे युवा कुस्तीपटू
काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवडच्या कुस्ती क्षेत्रासाठी अभिमानाची बाब समोर आली आहे. शासकीय जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत शहरातील तीन युवा कुस्तीपटूंनी दमदार कामगिरी करत आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला असून, त्यांची आगामी विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सोलापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत हे तिन्ही पैलवान पिंपरी-चिंचवडचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
पै. जय संदीप गोडांबे याने १९ वर्षांखालील ६१ किलो वजनी गटात, पै. शौर्य नितीन खेडकर याने १९ वर्षांखालील ग्रीको-रोमन ६१ किलो वजनी गटात, तर पै. रतन वाघमारे याने ६२ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवत विभागीय स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले.
तिन्ही कुस्तीपटूंनी कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीच्या जोरावर जिल्हास्तरावर मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे पिंपरी-चिंचवडच्या कुस्ती परंपरेला नवी उंची मिळाली आहे.
सोलापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या पै. जय संदीप गोडांबे, पै. शौर्य नितीन खेडकर आणि पै. रतन वाघमारे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आगामी स्पर्धेतही त्यांनी अशीच दमदार कामगिरी करत पिंपरी-चिंचवडचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा.







