ठाणे हादरले; बांबूने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात किसन भोईर यांचा दुर्दैवी मृत्यू, आरोपी राजू वाल्मीकी पोलिसांच्या ताब्यात
काशिनाथ शिंदे
ठाणे : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांवरील हल्ल्यांच्या घटनाही चिंतेचा विषय ठरत आहेत. ठाणे शहरात रात्रीच्या गस्तीवर कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर सराईत गुन्हेगाराने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक किसन भोईर (वय ५६) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने ठाणे शहरासह पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किसन भोईर हे चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. गुरुवारी रात्री ते नेहमीप्रमाणे गस्तीच्या कर्तव्यावर होते. पोखरण रोड क्रमांक दोन परिसरातील गांधीनगर आणि सुभाषनगर भागातून ते गस्त घालत असताना ही घटना घडली.
भोईर हे पोलीस गणवेशात कर्तव्य बजावत असताना आरोपी राजू वाल्मीकी (वय ३०) याने त्यांच्यावर मागून अचानक हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपीने बांबूने भोईर यांच्या डोक्यासह शरीरावर जोरदार प्रहार केल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. गंभीर दुखापत झाल्याने भोईर खाली कोसळले.
घटनेची माहिती मिळताच नागरिक आणि सहकारी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी भोईर यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलीस उपायुक्त प्रशांत कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वरुडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपी राजू वाल्मीकी याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली असून, घटनेच्या वेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता का, तसेच हल्ल्यामागील नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू आहे.
कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यावरच जीवघेणा हल्ला होऊन त्यांचा मृत्यू होणे ही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. पोलिसांवरील हल्ल्यांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईसोबतच गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रभावी नियंत्रणाची गरज या घटनेने पुन्हा अधोरेखित केली आहे.







