पिंपरी पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई), निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा विभागीय आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटात डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आकुर्डी, तर मुलींच्या गटात प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कम्प्युटर सायन्स, चिंचवड संघाने विजेतेपद पटकावले.
मुलांच्या अंतिम सामन्यात डीवायपीसीओई, आकुर्डी संघाने पीसीसीओई, निगडी संघाचा ३-१ असा पराभव करत प्रथम क्रमांक मिळविला. मुलींच्या अंतिम सामन्यात पीसीसीसीएस, चिंचवड संघाने पीसीसीओई, निगडी संघावर २-० अशी मात करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
पीसीसीओईच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक नरेंद्र लांडगे आणि अजिंक्य काळभोर यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सहसचिव डॉ. अक्षय काशीद, डॉ. गणेश चव्हाण, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. रमेश गायकवाड आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत मुलांच्या गटात पुणे जिल्ह्यातील ३५ संघ, तर मुलींच्या गटात २९ संघांनी सहभाग नोंदविला. त्यामुळे स्पर्धेत महाविद्यालयीन बॅडमिंटनपटूंमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, डीन एसडीडब्ल्यू डॉ. पद्माकर देशमुख आणि स्पर्धेचे समन्वयक तथा पीसीसीओईचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संतोष पाचारणे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या संघांना पीसीसीओई महाविद्यालयाच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
उपांत्य फेरीतही रंगल्या चुरशीच्या लढती
अंतिम फेरीपूर्वी झालेल्या उपांत्य सामन्यांमध्ये मुलांच्या गटात पीसीसीओई, निगडी संघाने एसएई, कोंढवा संघाचा, तर डीवायपीसीओई, आकुर्डी संघाने पीसीसीओईआर, रावेत संघाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
मुलींच्या गटात पीसीसीओई, निगडी संघाने पीसीसीओईआर, रावेत संघावर विजय मिळविला. तर पीसीसीसीएस, चिंचवड संघाने एएलसी, कान्हे संघाला नमवत अंतिम फेरीत प्रवेश केला
अंतिम निकाल
मुले :
प्रथम – डीवायपीसीओई, आकुर्डी
द्वितीय – पीसीसीओई, निगडी
तृतीय – पीसीसीओईआर, रावेत
मुली :
प्रथम – पीसीसीसीएस, चिंचवड
द्वितीय – पीसीसीओई, निगडी
तृतीय – एएलसी, कान्हे
सर्व विजेत्या संघांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.






