निबंध, पत्रलेखन, समूह नृत्य अन् पसायदान पाठांतर स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान
काशिनाथ शिंदे
मराठी भाषेचा अभिमान, साहित्यिक वारशाचे जतन आणि सांस्कृतिक परंपरांचा जागर; महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमधून दाखवली प्रतिभा!
पिंपरी मराठी भाषेचे समृद्ध साहित्यिक वैभव, सांस्कृतिक परंपरा आणि भाषेचे सौंदर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सप्ताहानिमित्त आयोजित निबंध लेखन, पत्रलेखन, समूह नृत्य आणि पसायदान पाठांतर स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात उत्साहात पार पडला.
विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांच्या लेखनकौशल्याला चालना मिळावी आणि महाराष्ट्राच्या समृद्ध साहित्यिक व सांस्कृतिक परंपरेची ओळख व्हावी, या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले.
निबंध लेखन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील विचार कल्पकतेने मांडले, तर पत्रलेखन स्पर्धेतून मराठी भाषेतील अभिव्यक्ती कौशल्य अधोरेखित झाले. समूह नृत्य स्पर्धेतून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे रंगतदार दर्शन घडले. पसायदान पाठांतर स्पर्धेच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा आणि विश्वकल्याणाच्या संदेशाचा जागर करण्यात आला.
समूह नृत्य स्पर्धेत शहरातील १५ शाळांमधील एकूण २२३ विद्यार्थी आणि ३० शिक्षक सहभागी झाले होते. तसेच पसायदान पाठांतर स्पर्धेत १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विजेत्या विद्यार्थ्यांसह उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला महापालिकेचे विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाचे व्यवस्थापक विकास वेताळ, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके, सरचिटणीस हिरा सरवदे, उपाध्यक्ष किशोर बारकूले आणि सदस्य तुषार झरेकर यांच्यासह शहरातील पत्रकार, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी भाषेचा अभिमान जपत तिचा समृद्ध वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे, विद्यार्थ्यांमध्ये भाषिक आत्मीयता निर्माण करणे आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
स्पर्धांतील विजेत्यांची नावे
१. निबंध लेखन स्पर्धा
प्रथम क्रमांक : समृद्धी अंताळकर
द्वितीय क्रमांक : प्रतिभा नितीन गायकवाड
तृतीय क्रमांक : दिव्या संदीप मोरे
उत्तेजनार्थ पारितोषिके :
भावना संजय आनंदपुरे
रेहान फय्याज शेख
२. पत्रलेखन स्पर्धा
प्रथम क्रमांक : पार्वती नरेश आठवले
द्वितीय क्रमांक : अर्णव दत्तात्रय खांडे
तृतीय क्रमांक : नेहा धनाजी गायकवाड
उत्तेजनार्थ पारितोषिके :
अनन्या गुरुषरण सिंग
आस्मी किरण सोळस्कर
३. समूह नृत्य स्पर्धा
प्रथम क्रमांक : इंद्रायणीनगर प्राथमिक शाळा, भोसरी
द्वितीय क्रमांक : पीसीएमसी इंग्रजी माध्यम शाळा, भोसरी (मुले)
तृतीय क्रमांक : यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा, थेरगाव
उत्तेजनार्थ पारितोषिके :
प्राथमिक शाळा क्रमांक १०३, पुनावळे
यशवंतराव चव्हाण प्राथमिक कन्या शाळा, थेरगाव
प्राथमिक कन्या शाळा क्रमांक १०३, पुनावळे
४. पसायदान पाठांतर स्पर्धा
प्रथम क्रमांक : श्रीपाद भागवत सावंत
द्वितीय क्रमांक : राजलक्ष्मी उमेश आरदवाड
तृतीय क्रमांक : श्रेया सुजित तापकिरे
उत्तेजनार्थ पारितोषिके :
योगेश ज्ञानेश्वर सोरमारे
आयशा संतोष गौतम







