२७ मंडळांचा सहभाग; पारंपरिक ढोल-ताशांचा दणदणाट, डीजे नगण्य; उत्साहात आणि शांततेत विसर्जन सोहळा
काशिनाथ शिंदे
पिंपरी: पिंपरीतील संत गाडगेबाबा चौकात (जुना कराची चौक) शुक्रवारी दुपारी तीन ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत तब्बल नऊ तास गणेश विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष पाहायला मिळाला. या मिरवणुकीत तब्बल २७ गणेश मंडळांनी सहभाग घेतला. यंदाच्या मिरवणुकीत ढोल-ताशांसह पारंपरिक वाद्यांचा बोलबाला राहिला, तर डीजेची संख्या अगदीच नगण्य होती. उत्साहपूर्ण वातावरणात आणि शांततेत मिरवणूक पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
महापालिका आणि पिंपरी पोलिस ठाण्याच्या शांतता समितीच्या वतीने संत गाडगेबाबा चौकात मिरवणुकीत सहभागी गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले. दुपारी तीन वाजता पिंपरी रेल्वे स्थानकाजवळील नवचैतन्य मित्र मंडळाचा गणपती मिरवणुकीने चौकात दाखल झाला. त्यानंतर सायंकाळी सात वाजेपर्यंत केवळ पाच मंडळांचे आगमन झाले.
सायंकाळी सात वाजता सिंग इंज किंग मंडळाचे, तर रात्री ७.५० वाजता साई मित्र मंडळाच्या गणरायाचे पारंपरिक वाद्यांच्या गजरात आगमन झाले. रात्री आठ वाजता लालबहादूर शास्त्री भाजी मंडई मंडळाच्या गणरायाचे आगमन झाले. सुवर्ण सिंहासनावरील विलोभनीय गणेशमूर्तीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. अशोका ढोल-ताशा पथकाने उत्कृष्ट खेळ सादर करत मिरवणुकीत रंगत आणली.
त्यानंतर पिंपरी फ्रुट मार्केट, कटलरी व्यापारी संघटनेच्या शिवशक्ती तरुण मंडळाचे आगमन झाले. तिरुपती बालाजीचा आकर्षक देखावा असलेली गणेशमूर्ती मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरली.
रात्री नऊच्या सुमारास भिमनगर येथील एस. पी. ग्रुपच्या गणरायाचे बैलगाडीतून आगमन झाले. मावळातील जय हनुमान तरुण मंडळाच्या ढोल-ताशा पथकाच्या दणदणाटाने वातावरण भारावून गेले. कराड येथील सह्याद्री मर्दानी दांडपट्टा प्रतिष्ठानच्या पथकाने सादर केलेल्या शिवकालीन मर्दानी खेळाने उपस्थितांची मने जिंकली. या पथकातील सात मुली आणि नऊ मुलांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.
रात्री साडेनऊ वाजता ओम साईराम मित्र मंडळाचे ढोल-ताशांच्या दणदणाटात आगमन झाले. त्यानंतर फुल मार्केटचा राजा आणि सावित्रीबाई फुले भाजी मंडई मंडळ मिरवणुकीत दाखल झाले.
रात्री साडेदहा वाजता अशोकनगर येथील दिग्विजय मित्र मंडळाचे आगमन झाले. मंडळाच्या वतीने भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात तरुणाईसह अबालवृद्धांनी जल्लोष करत नृत्याचा आनंद लुटला.
रात्री सव्वाअकरा वाजता भाट समाज सेवा ट्रस्ट मंडळाचे आगमन झाले. मंडळातील महिलांनी सादर केलेल्या गरबा नृत्याने उपस्थितांना ठेका धरायला लावला. यंदाच्या मिरवणुकीत महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. त्यामुळे महापालिकेच्या वतीने मंडळाच्या अध्यक्षांऐवजी महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिलांनी मोठा जल्लोष केला.
त्यानंतर गांधीनगर येथील न्यू स्टार मित्र मंडळ, ढोलीबाजाच्या तालावर आलेले वैशालीनगर मित्र मंडळ आणि हस्तीमुखाचा आकर्षक देखावा सादर करणारे सुदर्शन स्पोर्ट्स मित्र मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले. श्रीकृष्णाच्या आकर्षक देखाव्यासह गांधीनगर येथील भागवत मित्र मंडळ आणि जय भारत तरुण मंडळाचे आगमन झाले. मध्यरात्री बारा वाजता अष्टविनायक मित्र मंडळाच्या आगमनाने मिरवणुकीची सांगता झाली.
रिव्हर रोड घाटावर सकाळपासून विसर्जन
रिव्हर रोड येथील पवना नदी घाटावर गणेशमूर्ती विसर्जनासाठी दोन कृत्रिम हौदांची व्यवस्था करण्यात आली होती. महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी, पोलिस तसेच सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. सायंकाळी सहानंतर या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली. मध्यरात्री साडेबारा वाजेपर्यंत विसर्जन सुरू होते.
पिंपरीगावात कृत्रिम हौद, तलावावर गर्दी
पिंपरीगावात नगरसेवक संदिप वाघेरे यांच्या वतीने कृत्रिम हौदांसह आरती स्टँडची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांच्या मदतीसाठी स्वयंसेवकही तैनात होते.
वैभवनगर येथील पर्यावरणपूरक विसर्जन घाटावरील कृत्रिम तलावात गणेशमूर्ती विसर्जनासाठी घरगुती तसेच परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथे श्रीचंद आसवणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने आरती स्टँडसह महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांच्या मदतीसाठी तब्बल २०० स्वयंसेवक सेवा बजावत होते.
एकूणच, पारंपरिक ढोल-ताशांचा निनाद, आकर्षक देखावे, मर्दानी खेळ, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे पिंपरीतील गणेश विसर्जन मिरवणुकीने यंदा भक्ती, परंपरा आणि सामाजिक सलोख्याचा सुंदर मिलाफ साधला.






