आंतरराष्ट्रीय अनुभव आणि जागतिक दर्जाचे कौशल्य विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे – डॉ. गोविंद कुलकर्णी; ५५० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
काशिनाथ शिंदे
पिंपरी : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आंतरराष्ट्रीय अनुभव, दर्जेदार शिक्षण आणि जागतिक स्तरावरील कौशल्य आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. जपानसारख्या प्रगत देशात शिक्षण, संशोधन, उद्योग आणि रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या संधींची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘जपानची ओळख २०२६’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे (पीसीसीओई) संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केले.
भारत आणि जपान यांच्यातील शैक्षणिक, औद्योगिक व सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने जपानच्या मुंबईतील वाणिज्य दूतावासाच्या सहकार्याने पीसीसीओई येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष होते. पुण्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधील ५५० हून अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी जेट्रो मुंबईचे महासंचालक हिसाशी मुराकामी आणि सहाय्यक संचालक नीलम भाटिया यांनी जपानमधील करिअरच्या विविध संधी, तसेच भारतीय प्रतिभेला जपानी उद्योगांशी जोडण्यासाठी जेट्रोतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. विशेष म्हणजे, नोव्हेंबर २०२६ मध्ये पीसीसीओई येथे जपानी उद्योगांशी संबंधित विशेष परिसंवाद आयोजित करण्याची घोषणाही करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना जपानमधील उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे.
पीसीसीओईच्या आंतरराष्ट्रीय संबंध विभाग आणि जपान सुविधा केंद्र यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमात जपानची शिक्षणपद्धती, जपानी भाषा, औद्योगिक संस्कृती, आधुनिक तंत्रज्ञान, रोजगाराच्या संधी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील करिअरचे पर्याय याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांना जागतिक व्यावसायिक वातावरणाची प्रत्यक्ष ओळख झाली.
या कार्यक्रमात जपान फाउंडेशन, नवी दिल्लीचे पश्चिम विभागातील जपानी भाषा शिक्षणाचे वरिष्ठ सल्लागार मकोतो सायतो, ॲस्टेमो एफआयई प्रा. लि.चे संचालक सुधीर गोगटे, जलताप, पुणे संस्थेचे संस्थापक सदस्य डॉ. हरी दामले, डीजी फ्युचरटेक इंडिया प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम कुलकर्णी, जपानी करिअर समुपदेशक व व्यावसायिक सल्लागार राजेंद्र जोशी आणि फिडेल सॉफ्टटेक लि.च्या उच्च तंत्रज्ञान उपाययोजना विभागाचे सहाय्यक उपाध्यक्ष दीपक जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
स्वागतपर भाषणात पीसीसीओईच्या आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या अधिष्ठाता डॉ. रोशनी राऊत यांनी जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यासाठी संस्थेत नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम, उद्योग प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले. ‘जपानची ओळख’सारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांची जागतिक स्पर्धात्मक क्षमता विकसित होण्यास मदत होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या उपक्रमासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार पीसीसीओईच्या आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील यांनी मानले. उपस्थितांनी विविध प्रदर्शने व माहितीपर स्टॉल्सना भेट देत संवाद साधला.






