सुकटा शिवारातील लोखंडी रॉडने केलेल्या मारहाण प्रकरणातील मुख्य फरार आरोपी सचिन उर्फ भैय्या जानकरला अटक
काशिनाथ शिंदे
भूम / धाराशिव : पवनचक्कीच्या वादातून सुकटा शिवारात फिर्यादीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी सचिन उर्फ भैय्या बबन जानकर (वय ३१, रा. सुकटा, ता. भूम, जि. धाराशिव) याला भूम पोलिसांनी लोणावळा येथून शिताफीने अटक केली. वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि पार्टी करण्यासाठी आरोपी लोणावळ्यात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई
या प्रकरणी भूम पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २०८/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. तत्कालीन तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके यांनी तपास पूर्ण करून निष्पन्न आरोपींविरुद्ध यापूर्वीच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. मात्र, मुख्य आरोपी सचिन उर्फ भैय्या जानकर हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.
दरम्यान, आरोपी वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळा येथे येणार असल्याची गोपनीय माहिती परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा भूम पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमोल मोहिते यांना मिळाली. त्यांनी तातडीने पथकाला सूचना देऊन आरोपीला पकडण्यासाठी नियोजन केले. भूम पोलिसांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या मदतीने परिसरात सापळा रचला. त्यानंतर रात्रीच्या सुमारास आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
आरोपीविरुद्ध पुणे आणि धाराशिव जिल्ह्यांत गुन्हे
अटक करण्यात आलेल्या सचिन उर्फ भैय्या जानकर याच्याविरुद्ध पुणे आणि धाराशिव जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.
१. वाकड पोलीस ठाणे, पुणे : गु.र.नं. ७९/२०१५ — भारतीय दंड संहितेची कलमे ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४.
२. दिघी पोलीस ठाणे, पुणे : गु.र.नं. २८८/२०२० — कलमे ३६५, ३२३, ३२४, ५०४, ३४.
३. भूम पोलीस ठाणे, धाराशिव : गु.र.नं. २८८/२०२३ — कलमे ३२४, ३२५, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, २०६.
४. हिंजवडी पोलीस ठाणे, पुणे : गु.र.नं. ३१५३/२०१३ — शस्त्र अधिनियम तसेच मुंबई पोलीस कायद्याच्या कलम ३७(१)(३)/१३५ अन्वये गुन्हा.
५. वाकड पोलीस ठाणे, पुणे : गु.र.नं. ११/२०१८ — मुंबई पोलीस कायद्याच्या कलम ३७(१)(३)/१३५ अन्वये गुन्हा.
अमोल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी
ही कारवाई धाराशिवचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, भूम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा भूम पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमोल मोहिते, पोलीस उपनिरीक्षक बर्डे, पोलीस अंमलदार अमोल कवडे आणि जयराम क्षीरसागर यांच्या पथकाने लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक केली.
अटक आरोपीला न्यायालयात हजर करून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.







