पुण्यात राष्ट्रीय काँक्रीट दिन व अभियंता दिनानिमित्त भव्य प्रदर्शनाचा शुभारंभ; शंभरहून अधिक महाविद्यालयांचा सहभाग
काशिनाथ शिंदे
पुणे : राष्ट्रीय काँक्रीट दिन व अभियंता दिनानिमित्त आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय काँक्रीट दिन व अभियंता दिन सोहळा २०२६ आणि भव्य बांधकाम व पायाभूत सुविधा प्रदर्शनाचा शुभारंभ पर्वती येथील अनंतराव पवार अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात झाला. या प्रदर्शनात शंभरहून अधिक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले असून, तीन हजारांहून अधिक विद्यार्थी, अभियंते, उद्योग प्रतिनिधी, प्रदर्शक आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यंदाच्या सोहळ्याची ‘काँक्रीटमधील नवकल्पनांच्या माध्यमातून शाश्वत भारताची उभारणी’ ही संकल्पना आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी एबीएमएसपीच्या सरचिटणीस प्रमिला गायकवाड प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच एमकेव्हीडीसी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत धुमाळ, एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या प्रधान सल्लागार डॉ. सुषमा कुलकर्णी, एबीएमएसपीचे खजिनदार धैर्यशील वांडेकर, अॅड. भगवानराव साळुंखे, पुणे आरएमसी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, प्रमुख संयोजक अभियंता युसूफ ए. एस. इनामदार, पुणे आरएमसी असोसिएशनचे सचिव डॉ. सचिन काटे यांच्यासह विविध शैक्षणिक, व्यावसायिक व उद्योग संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कौशल्याला मिळणार व्यासपीठ
काँक्रीट क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान, हरित काँक्रीट, शाश्वत बांधकाम पद्धती आणि आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव मिळावा आणि त्यांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, यासाठी विविध प्रकल्प स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमात तांत्रिक स्पर्धा, परिसंवाद, ज्ञानविनिमय सत्रे तसेच उद्योग-विद्यार्थी संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. काँक्रीट तंत्रज्ञान, बांधकाम, पायाभूत सुविधा, यंत्रसामग्री, डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, संरचनात्मक अभियांत्रिकी आणि सुरक्षितता यांसारख्या आधुनिक विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक
उद्घाटनानंतर मान्यवरांच्या हस्ते भव्य बांधकाम व पायाभूत सुविधा प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. बांधकाम क्षेत्रातील अत्याधुनिक उत्पादने, यंत्रसामग्री, उपकरणे, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांचे प्रदर्शन येथे करण्यात आले आहे.
यामध्ये रेडी-मिक्स काँक्रीट व काँक्रीट तंत्रज्ञान, बांधकाम यंत्रसामग्री, काँक्रीट पंप व मिश्रण संयंत्रे, बांधकाम रसायने, विद्युत व आधुनिक बांधकाम उपकरणे, शाश्वत बांधकाम तंत्रज्ञान, संरचनात्मक अभियांत्रिकी व सुरक्षितता, विनाशविरहित चाचणी तंत्रज्ञान, डिजिटल बांधकाम, कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच पायाभूत सुविधा विकासासाठीच्या विविध उपाययोजनांचा समावेश आहे.
उद्योग-शिक्षण क्षेत्रातील संवादाला चालना
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या सहभागामुळे हे प्रदर्शन उद्योग, शिक्षण आणि व्यावसायिक क्षेत्रातील संवादासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे. तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, विद्यार्थ्यांना रोजगार व करिअरच्या नव्या संधींची माहिती आणि उद्योग क्षेत्रातील बदलांची ओळख या माध्यमातून विद्यार्थ्यांना होत आहे.
शासकीय यंत्रणा, अभियंते, आरएमसी उत्पादक, कंत्राटदार, विकासक, वास्तुविशारद, सल्लागार, उत्पादक, तंत्रज्ञान कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी यांना एकाच व्यासपीठावर आणून ज्ञान, तंत्रज्ञान व अनुभवांची देवाणघेवाण घडवून आणणे हा या सोहळ्याचा प्रमुख उद्देश आहे.
भारताच्या वेगाने विकसित होत असलेल्या पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी गुणवत्तापूर्ण, सुरक्षित, शाश्वत आणि तंत्रज्ञानाधारित बांधकाम पद्धतींची गरज लक्षात घेऊन नवकल्पना, तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात आला आहे.
हा सोहळा ११ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असून, तांत्रिक सत्रे, विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा, प्रदर्शन, उद्योग संवाद, पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.






