दहा विद्युत रोहित्र चोरीचा पर्दाफाश; चाकण दक्षिण व आळंदीतील सात गुन्ह्यांची उकल
काशिनाथ शिंदे
पिंपरी, आळंदी आणि चाकण परिसरातील विद्युत रोहित्र (डीपी) चोरी करून त्यातील तांबे व ॲल्युमिनियम भंगारात विकणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-३ने पर्दाफाश केला. पोलिसांनी टोळीतील चार आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून दहा डीपीमधील ५१० किलो कॉपर व ॲल्युमिनियम धातूसह एकूण १६ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत चाकण दक्षिण पोलीस ठाण्यातील तीन आणि आळंदी पोलीस ठाण्यातील चार, असे सात गुन्हे उघडकीस आले आहेत.
गुन्हे शाखा युनिट-३चे पोलीस हवालदार बाळासाहेब खेडकर यांना आळंदी व चाकण परिसरात विद्युत रोहित्रांची चोरी करणारा आरोपी चोरी केलेल्या रोहित्रांमधील तांब्याच्या तारा विक्री करण्यासाठी कोयाळी येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोयाळी परिसरात सापळा रचला.
या कारवाईत अक्षय बाबासाहेब काळे (वय ३४) याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने राहुल दिनकर पोकळे (वय २०) आणि नेपाळी उर्फ ललित मगर यांच्या साथीने विद्युत रोहित्रांची चोरी केल्याची माहिती दिली. चोरी केलेल्या रोहित्रांमधील कॉपर व ॲल्युमिनियम कोयाळी परिसरातील भंगार व्यावसायिकांना विकल्याचेही तपासात निष्पन्न झाले.
त्यानंतर पोलिसांनी ब्रिज मोहन असर्फीलाल प्रजापती (वय ३०) आणि इजहार इस्माईल चौधरी (वय ४०) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने जप्त करण्यात आली.
१६.३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
कारवाईत पोलिसांनी ५ लाख १० हजार रुपये किमतीचा ५१० किलो कॉपर व ॲल्युमिनियम धातू, ५ लाख ५५ हजार रुपये किमतीची इको चारचाकी, ५ लाख १५ हजार रुपये किमतीची पिकअप गाडी आणि ५५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल, असा एकूण १६ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सात गुन्ह्यांची उकल
या कारवाईमुळे चाकण दक्षिण पोलीस ठाण्यातील गुन्हे रजिस्टर क्रमांक ७९/२०२६, १३/२०२६ आणि १८/२०२६, तसेच आळंदी पोलीस ठाण्यातील गुन्हे रजिस्टर क्रमांक ५६३/२०२५, २२६/२०२५, ११३/२०२५ आणि ८६/२०२६ असे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत.
चार आरोपी अटकेत; एकाचा शोध सुरू
अटक आरोपींमध्ये अक्षय बाबासाहेब काळे (वय ३४, रा. भानोबाची कोयाळी, गणेशनगर, खिरपाड वस्ती, ता. खेड), राहुल दिनकर पोकळे (वय २०, रा. भानोबाची कोयाळी, पोकळदरा, ता. खेड), ब्रिज मोहन असर्फीलाल प्रजापती (वय ३०, व्यवसाय भंगार दुकान, रा. गोळेगाव रोड, महादेव मंदिराजवळ, मरकळ, ता. खेड) आणि इजहार इस्माईल चौधरी (वय ४०, व्यवसाय भंगार दुकान, रा. भानोबाची कोयाळी, ता. खेड) यांचा समावेश आहे.
या प्रकरणातील नेपाळी उर्फ ललित मगर, रा. नेपाळ, पूर्ण पत्ता अज्ञात हा आरोपी फरार असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. अटक आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील तपासासाठी आळंदी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने केली.
कारवाईत पोलीस हवालदार गरजे, बिराजदार, बोराडे, भोसुरे तसेच पोलीस अंमलदार खेडकर, गोंटे, रुपनवर, महाले, भांगले, फापाळे आणि गुंजाळ यांनी सहभाग घेतला.
विद्युत रोहित्र चोरीच्या मालिकेचा छडा लावत सात गुन्ह्यांची उकल आणि तब्बल १६.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्याची कामगिरी युनिट-३च्या पथकाने बजावली आहे.







