अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारातून कमावलेल्या संपत्तीवर प्रशासनाचा हातोडा; एनडीपीएस कायद्यांतर्गत सक्षम प्राधिकरणाची मंजुरी
काशिनाथ शिंदे
पुणे : अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारातून मोठ्या प्रमाणात संपत्ती कमावणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अशाच एका प्रकरणात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारातून संपादित करण्यात आलेल्या तब्बल ५५ लाख १६ हजार रुपयांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यास सक्षम प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.
अंमली पदार्थांच्या तस्करी व अवैध व्यापारातून मिळविलेल्या पैशातून संबंधितांनी मालमत्ता उभी केल्याचे तपासात समोर आल्याने ही कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. या प्रकरणात एनडीपीएस कायद्यातील तरतुदींनुसार मालमत्ता जप्त करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
या प्रस्तावाची छाननी केल्यानंतर सक्षम प्राधिकरणाने ५५.१६ लाख रुपयांच्या मालमत्ता जप्तीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायातून आर्थिक साम्राज्य उभारणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
अंमली पदार्थांच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशांचा वापर करून स्थावर-जंगम मालमत्ता निर्माण करणाऱ्या आरोपींवर आर्थिक कारवाईचा बडगा उगारल्याने अशा गैरव्यवहारांना आळा बसण्यास मदत होणार आहे. गुन्हेगारीतून मिळविलेल्या संपत्तीवर थेट कारवाई करण्याची प्रशासनाची भूमिका या प्रकरणातून स्पष्ट झाली आहे.







