काशिनाथ शिंदे
पुणे : वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी पाच रुपयांचा माऊथ ऑर्गन हातात घेतला आणि सुरू झाला एका आगळ्यावेगळ्या संगीतप्रवासाचा अध्याय. आज वयाच्या ६५व्या वर्षीही माऊथ ऑर्गनच्या माध्यमातून संगीताची सेवा करतानाच सामाजिक बांधिलकी जपणारे एम. डी. चौधरी हे संगीतप्रेमींसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.
मुळचे ईश्वरपूर, जिल्हा सांगली येथील चौधरी यांनी बी.कॉम.पर्यंत शिक्षण घेतले असून सध्या ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. ते ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे अध्यक्ष म्हणूनही सामाजिक कार्य करीत आहेत.
ईश्वरपूर गावच्या यात्रेत वयाच्या सातव्या वर्षी पाच रुपयांचा माऊथ ऑर्गन घेतला. सुरुवातीला केवळ तो वाजवण्याचा प्रयत्न करताना निर्माण झालेली आवड हळूहळू छंदात आणि पुढे आयुष्यभराच्या साधनेत परिवर्तित झाली. त्यानंतर शंभर रुपयांचा माऊथ ऑर्गन घेऊन चौधरी यांनी नियमित सराव सुरू केला. त्यांच्या वादनाला लोकांची पसंती मिळू लागली. शाळेतील गॅदरिंगपासून महाविद्यालयीन कार्यक्रमांपर्यंत त्यांनी आपल्या वादनातून रसिकांची मने जिंकली.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील युवक महोत्सवात त्यांनी माऊथ ऑर्गन वादनात द्वितीय क्रमांक मिळवला, तर इचलकरंजी येथे संगीत वाद्य वादन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे त्यांच्या संगीतप्रवासाला आणखी बळ मिळाले.
नोकरीनिमित्त पुण्यात आल्यानंतर तळेगाव दाभाडे येथील ईगल फ्लास्क कंपनीत काम करत असतानाही त्यांनी संगीताची साधना सुरूच ठेवली. पुण्यातील गणेशोत्सव तसेच पुणे फेस्टिव्हलमध्ये त्यांनी सहभाग घेतला. बालगंधर्व रंगमंदिरासारख्या प्रतिष्ठित व्यासपीठांवर विविध कार्यक्रम सादर करून त्यांनी रसिकांची दाद मिळवली.
त्यांच्या माऊथ ऑर्गन वादनाचा प्रवास केवळ पुण्यापुरता मर्यादित राहिला नाही. आकाशवाणी पुणे, दूरदर्शन मुंबई आणि आकाशवाणी सांगली येथेही त्यांनी कार्यक्रम सादर केले आहेत. ऑल इंडिया माऊथ ऑर्गन क्लबच्या माध्यमातून राजस्थान, दिल्ली, कोलकाता, इंदूर, जयपूर, मुंबई, हरिद्वार, पुणे तसेच दुबई येथेही त्यांनी माऊथ ऑर्गन वादनाचे कार्यक्रम केले आहेत. इंदूर येथे गोल्डन बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्यांनी सहभाग नोंदवला आहे.
संगीताचा आनंद समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्याचे कामही चौधरी सातत्याने करीत आहेत. ‘दिवाळी पहाट’, ‘स्वर मिलाफ’, ‘मेरी आवाज सुनो’ आणि ‘स्वरांजली संगीतमय नजराणा’ यांसारख्या कार्यक्रमांची निर्मिती करून त्यांनी अनेक ज्येष्ठ नागरिकांना सहभागी करून घेतले. ज्येष्ठ नागरिकांना संगीताच्या माध्यमातून आनंद मिळावा, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
विशेष म्हणजे, येरवडा कारागृहातील कैद्यांसाठीही त्यांनी संगीतमय कार्यक्रम आयोजित केला. संगीताच्या माध्यमातून कैद्यांना सकारात्मक वातावरण मिळावे आणि त्यांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता.
संगीतासोबतच मानवाधिकार आणि सामाजिक क्षेत्रातही चौधरी यांचे कार्य सुरू आहे. त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानाची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात केंद्रीय मंत्री व खासदार रामदास आठवले यांच्या हस्ते त्यांना ‘मानव रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याच ठिकाणी त्यांनी माऊथ ऑर्गनवर मराठी लावण्यांचा विशेष कार्यक्रमही सादर केला.
त्यांना स्वामी विवेकानंद समाज गौरव पुरस्कार, अण्णाभाऊ साठे समाज भूषण पुरस्कार, ज्येष्ठ नागरिक संगीत सरिता पुरस्कार आणि नेताजी सुभाषचंद्र बोस पुरस्कार यांसह विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
माऊथ ऑर्गन हे वाद्य वाजवणे सोपे नसल्याचे चौधरी सांगतात. वाद्य वाजवताना एकाच वेळी हवा बाहेर सोडणे आणि आत घेणे, अशी प्रक्रिया करावी लागते. त्यामुळे या वाद्याचे वादन अत्यंत कौशल्याचे आणि अवघड आहे. मात्र, याच दुर्मिळ वाद्याची लोकप्रियता पुन्हा वाढावी, यासाठी ते आजही प्रयत्नशील आहेत.
“माऊथ ऑर्गन हे दुर्मिळ होत चाललेले वाद्य आहे. युवकांनी या वाद्याची कला शिकून ती पुढे नेली पाहिजे. माऊथ ऑर्गनला पुन्हा एकदा लोकप्रियता मिळावी, हीच इच्छा आहे,” असा संदेश चौधरी देतात.
संगीताची साधना, सामाजिक बांधिलकी आणि दुर्मिळ होत चाललेल्या वाद्याचे जतन करण्याची धडपड यांचा अनोखा संगम म्हणजे एम. डी. चौधरी यांचा ५८ वर्षांचा माऊथ ऑर्गन प्रवास. एका छोट्याशा गावच्या यात्रेत पाच रुपयांच्या वाद्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज देश-विदेशातील व्यासपीठांपर्यंत पोहोचला आहे.







