काशिनाथ शिंदे : लांडेवाडी
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त लांडेवाडी येथील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनात उत्साहपूर्ण वातावरणात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक तथा शहर सुधारणा समिती सदस्य आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)चे शहराध्यक्ष कुणालभाऊ वाव्हळकर यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर त्यांच्या हस्ते आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. समाजहिताच्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याच कार्यक्रमात ममता फाउंडेशन (लर्निंग क्लासेस) चेही उद्घाटन कुणालभाऊ वाव्हळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास माता रमाई फाउंडेशनच्या अध्यक्षा उज्ज्वलाताई खुणे, छबुताई गायकवाड, लताताई वारभुवन यांच्यासह रमाई फाउंडेशनच्या सर्व महिला पदाधिकारी, महिला-पुरुष कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन अक्षय (भैय्या) दुनघव आणि रोहिणीताई अक्षय दुनघव यांनी केले. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करत समाजसेवेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.







