काशिनाथ शिंदे : शिवणे पुणे
शिवणे परिसरातील देशमुखवाडी येथे अवैधरित्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे शाखा युनिट-३ ने धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल १ लाख ६५ हजार ५६४ रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य माल जप्त करण्यात आला असून, सोमनाथ शामराव गरड (वय ४४, रा. शिंदे पार्क हौसिंग सोसायटी, उत्तमनगर, पुणे) याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट-३ चे पथक अवैध धंद्यांवर कारवाई तसेच फरार आरोपी आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करत होते. त्यावेळी देशमुखवाडी, शिवणे येथील एका खोलीतून गुटख्याची अवैध विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत सोमनाथ गरड याला ताब्यात घेत त्याच्याकडील विविध प्रकारचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ असा १,६५,५६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक केलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुणे शहरात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून, अशा अवैध धंद्यांवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्विनी सातपुते, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३ चे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम आणि त्यांच्या पथकाने केली.







