काशिनाथ शिंदे : चाकण
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्तावित मार्ग बदलून तो अहिल्यानगरमार्गे वळविण्याच्या निर्णयाविरोधात ग्रामस्थांचा संताप उफाळून आला आहे. क्रांतिदिनी पुणे-नाशिक महामार्गावर चक्काजाम आंदोलन करत ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. चाकण, राजगुरूनगर, मंचर, जुन्नर आणि संगमनेर तालुक्यांतील ग्रामस्थांनी सकाळी दहा वाजता एकाचवेळी रास्ता रोको आंदोलन केले.
२०१६ मध्ये निश्चित करण्यात आलेल्या पुणे-चाकण-खेड-मंचर-नारायणगाव-सिन्नर-नाशिक या थेट मार्गानेच सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी करावी, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. मार्ग बदलल्यास मूळ प्रस्तावित मार्गावरील गावांना आणि नागरिकांना या प्रकल्पाचा अपेक्षित फायदा मिळणार नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
पुणे-नाशिक महामार्गावर दिवसेंदिवस वाहतुकीचा ताण वाढत असून, चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव आदी भागांत वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे या भागातून जाणारा सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प केवळ प्रवासाच्या दृष्टीने नव्हे, तर महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
मार्ग बदलण्याच्या निर्णयामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, सरकारने याबाबत तातडीने पुनर्विचार करावा, अशी मागणी करण्यात आली. मूळ मार्गाला डावलून रेल्वेचा मार्ग बदलण्याचा निर्णय आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी आंदोलनाच्या माध्यमातून आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला.
एकाचवेळी विविध ठिकाणी झालेल्या रास्ता रोकोमुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.
“मूळ मार्गानेच रेल्वे, अन्यथा आंदोलन तीव्र!” या भूमिकेमुळे पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे







