आजच्या एआयच्या युगात संतसाहित्यच खरे मार्गदर्शक – गोविंददेव गिरी महाराज

आजच्या एआयच्या युगात संतसाहित्यच खरे मार्गदर्शक – गोविंददेव गिरी महाराज

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीवर्षानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे “ज्ञानोबा ते तुकोबा” या विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. आजच्या एआयच्या युगात संतसाहित्याचा अभ्यास नवतरुणांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी यांनी केले. ते विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात आयोजित उद्घाटन सत्राच्या बीजभाषणात बोलत होते.

या राष्ट्रीय परिषदेचे सहआयोजक म्हणून विद्यापीठाचे संत ज्ञानदेव, संत नामदेव व संत तुकाराम महाराज अध्यासन तसेच संस्कृत, मराठी, हिंदी , तत्वज्ञान विभाग आणि ललित कला केंद्र सहभागी आहेत.

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर व संदीप पालवे, अधिसभा सदस्य, कुलसचिव तथा वित्त व लेखाधिकारी सीएमए डॉ. चारुशीला गायके आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.

गोविंददेव गिरी महाराज पुढे म्हणाले की, आधुनिक पाश्चात्त्य साहित्यात आत्मविकास, मानवीय संबंध, व्यवस्थापन आणि नेतृत्व विकास हे चार प्रमुख विषय आढळतात; मात्र हेच विषय संतसाहित्यात फार पूर्वीपासून अंतर्भूत असून संतांनी त्यावर सखोल विचार मांडले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांपासून संत तुकाराम महाराजांपर्यंतच्या संतविचारांचा सुसंगत अनुबंध त्यांनी उलगडून सांगितला. या संतपरंपरेचे मूळ श्रीमद्भागवत व भगवद्गीतेमध्ये असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाभारतातील यक्षप्रश्नाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, संत हे समाजाला दिशा दाखवणारे महान पुरुष आहेत. पुढे त्यांनी या परंपरेत समर्थ रामदासस्वामींचा अनुबंध मांडत महाराष्ट्रातील अद्वैत आणि भक्ती यांचा अनोखा समन्वय अधोरेखित केला. अद्वैत आणि भक्ती यांचा असा समन्वय केवळ महाराष्ट्राच्या संतपरंपरेतच प्रकर्षाने दिसून येतो, असेही त्यांनी नमूद केले.

कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “या परिषदेत होणारे अंतरविद्याशाखीय अध्ययन हे निश्चितच अभ्यासकांसाठी नवनीत ठरणार आहे.”

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तत्वज्ञान विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. हरीश नवले यांनी केले. कार्यक्रमास विभागप्रमुख प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे, प्रा. डॉ. सदानंद भोसले, प्रा. डॉ. दिवाकर मोहंती, अध्यासनप्रमुख डॉ. अरुणा ढेरे, डॉ. श्यामा घोणसे आदी मान्यवरांसह विविध विद्यापीठ अधिकार मंडळांचे पदाधिकारी, शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

See also  पिंपरी-चिंचवडमध्ये शैक्षणिक आणि क्रीडा क्रांती

ही राष्ट्रीय परिषद संतसाहित्याच्या अभ्यासाला नवी दिशा देणारी ठरेल, तसेच नव्या पिढीला मूल्याधिष्ठित जीवनदृष्टी देण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!