Team DakshTimes: Kashinath Shinde
पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठ्यावर पवना नदीतील वाढत्या प्रदूषणामुळे गंभीर परिणाम होत असून नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाल्याचा इशारा नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी दिला आहे.
नगरसेविका तरस यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवना नदीत साचलेली जलपर्णी, प्लास्टिक कचरा, सांडपाणी तसेच मृत प्राणी यामुळे पाण्याची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावली आहे. हेच दूषित पाणी जलशुद्धीकरण केंद्राकडे येत असल्याने ते पूर्णपणे शुद्ध होण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारचे दूषित पाणी पिण्यासाठी वापरल्यास नागरिकांमध्ये पोटाचे विकार, त्वचारोग आणि इतर संसर्गजन्य आजार वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे हा केवळ पर्यावरणाचा नव्हे, तर थेट सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न बनला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर नगरसेविका तरस यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून जलशुद्धीकरण प्रक्रियेत त्रुटी असल्यास त्याची तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
“पिंपरी-चिंचवडकरांचे आरोग्य आणि पर्यावरण सुरक्षित ठेवणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे सर्वोच्च प्राधान्याने लक्ष दिले जाईल,” असे नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी सांगितले.
या गंभीर विषयावर आगामी सर्वसाधारण सभेत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने ठोस आणि प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.









Leave a Reply