Team DakshTimes: Kashinath Shinde
पिंपरी : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ ने अचूक माहितीच्या आधारे दिघी परिसरात अवैध विदेशी दारू विक्रीवर थरारक कारवाई करत तिघांना रंगेहात पकडले. या कारवाईत सुमारे २ लाख ४८० रुपयांचा दारू साठा, मोबाईल फोन व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.
गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दिघी हद्दीत एका शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी दारू साठवून विक्री सुरू असल्याचे समोर आले. माहितीची खातरजमा करून पोलीसांनी सापळा रचला. पथकाने घटनास्थळी पोहोचताच संशयित हालचाली करणाऱ्या आरोपींवर नजर ठेवली आणि योग्य क्षण साधत अचानक छापा टाकला.
पोलीसांनी झडती घेतली असता आरोपींकडे विविध कंपन्यांच्या विदेशी दारूच्या बॉक्सेसचा साठा आढळून आला. तसेच विक्रीसाठी तयार ठेवलेल्या बाटल्या आणि वापरात असलेले मोबाईल फोन जप्त करण्यात आले. आरोपींना घटनास्थळीच ताब्यात घेऊन त्यांच्याकडील संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत रामप्रसाद साळुंखे (वय ३३), तिलक हेमंत पटेल (वय २१) आणि अनिल रामसुरत यादव (वय २४) यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, उपायुक्त शिवाजी पवार व सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
गुन्हे शाखा युनिट-३ चे पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जावळे, पोलीस अंमलदार सोननाथ बोबडे, सागर सूर्यवंशी, श्रीधन इचके, शशिकांत नांगरे, समीर काळे व निखिल फापाळे यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई यशस्वी केली. दरम्यान, आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख ४८० रुपये असून, दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध दारू विक्रीविरोधात अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू ठेवणार असल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले आहे.









Leave a Reply