स्पा सेंटरच्या नावाखालील गैरप्रकारांवर लगाम; राज्य सरकारकडून लवकरच कडक नियमावली

TeamDakshTimes: Kashinath Shinde

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडसह पुणे परिसरातील आयटी हबमध्ये ‘स्पा’ आणि ‘वेलनेस सेंटर’च्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापार व मानवी तस्करीच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी राज्य सरकार लवकरच स्वतंत्र आणि कडक नियमावली जाहीर करणार आहे. विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पुढील तीन ते चार महिन्यांत नवीन नियमावली लागू केली जाईल, असे स्पष्ट केले.

आमदार गोरखे यांनी सभागृहात बोलताना सांगितले की, पुणे व पिंपरी-चिंचवडसारख्या शैक्षणिक शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या तरुणांना स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांचा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी हे स्पा सेंटर प्रत्यक्षात देहव्यापार, अमली पदार्थांची देवाणघेवाण आणि मानवी तस्करीचे अड्डे बनल्याचे गंभीर आरोप त्यांनी केले. विमाननगर परिसरातील एका महिलेच्या मृत्यूची घटना ही या प्रकारांची तीव्रता दाखवणारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर, केवळ छापे टाकून कारवाई करण्यापेक्षा या व्यवसायावर प्रभावी नियंत्रण ठेवणारी स्पष्ट नियमावली आवश्यक असल्याचे गोरखे यांनी अधोरेखित केले. ‘धाड टाकली की मालक फरार होतो’ ही परिस्थिती बदलण्यासाठी परवाना प्रणाली अधिक कडक करण्याची मागणी त्यांनी केली.

गृह राज्यमंत्री कदम यांनी सांगितले की, प्रस्तावित नियमावलीत स्पा व्यवसायासाठी कठोर परवाना अटी, नियमित तपासणी व्यवस्था आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई यांचा समावेश असेल. तसेच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि संबंधित विभागांमध्ये समन्वय वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे.

दरम्यान, या प्रकरणात काही विशिष्ट घटकांकडून संघटित पद्धतीने हा व्यवसाय चालवला जात असल्याचे आरोपही करण्यात आले असून, त्याबाबत सखोल चौकशी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राज्य सरकारकडून येणाऱ्या या नियमावलीमुळे पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील स्पा व्यवसाय अधिक पारदर्शक व नियंत्रित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

See also  हातचलाखीचा खेळ, पोलिसांनी केला फेल! बसमधील प्रवाशांचे लक्ष विचलित करून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ ने केला पर्दाफाश.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!