हातचलाखीचा खेळ, पोलिसांनी केला फेल! बसमधील प्रवाशांचे लक्ष विचलित करून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ ने केला पर्दाफाश.

Team DakshTimes: Kashinath Shinde

बसमधील गर्दीचा फायदा घेत लहान मुलांना सोबत ठेवून प्रवाशांचे लक्ष विचलित करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या महिला टोळीचा गुन्हे शाखा युनिट-३ने पर्दाफाश केला. या कारवाईत सहा संशयित महिलांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. त्यानंतर सापळा रचून संबंधित महिला आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अनुराधा ऊर्फ पार्वती मंगेश बुध्दिनाथ (वय ३०), अंजली राम (वय २१), राधा चरण वैद्य (वय २१), कल्पना बाला वैद्य (वय २१), श्वेता उमर वैद्य (वय २१) आणि जानकी अनिल वैद्य (वय ३०) यांचा समावेश आहे. या सर्व महिला शिक्रापूर परिसरातील रहिवासी आहेत.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १४७/२०२६, भा.न्या.स. २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) अन्वये दाखल गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-३ कडून करण्यात येत होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सुनील जावळे, पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, सागर सूर्यवंशी, मनोज साबळे, महिला पोलीस हवालदार सोनवणे, पोलीस नाईक गोनटे तसेच पोलीस शिपाई स्वप्निल महाले, शशिकांत नांगरे, तुषार वराडे, समीर काळे, सुंदर थोरात, सुधीर दांगट, निखिल फापाळे, राजकुमार इघारे व महिला पोलीस शिपाई भोर यांनी तपास केला.

तपासादरम्यान घटनास्थळापासून शिक्रापूरपर्यंत विविध मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यातून आरोपी गुन्हा करून रिक्षा व ट्रकच्या सहाय्याने पसार होत असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महिलांचा शोध घेण्यात आला.

सर्व आरोपी सध्या रा. जातेगाव (खुर्द), शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे असून मूळ रा. हनुमान मंदिराजवळ, मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर येथील आहेत. चौकशीदरम्यान त्यांनी एकत्र येऊन हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

See also  पिंपरी-चिंचवडमध्ये शैक्षणिक आणि क्रीडा क्रांती

या आरोपी महिलांकडून सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ₹८९,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दिनांक २१ मार्च २०२६ रोजी गुन्ह्याचा उलगडा करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस सहआयुक्त  डॉ. शरदकुमार महावीरकर, अपर पोलीस आयुक्त  मनोज लोहार, पोलीस उपआयुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त  डॉ. विजय मोरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त  नितीन दिवटे यांच्या सूचनांनुसार ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, या टोळीने इतर ठिकाणीही अशाच प्रकारे चोरी केल्याची शक्यता असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!