DakshTimes: Kashinath Shinde
पिंपरी: रेशीम बाजारातील दररोजचे भाव आणि त्याचे सखोल विश्लेषण ऑनलाइन उपलब्ध करून देत हजारो शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ व स्पर्धात्मक दर मिळवून देणाऱ्या एका निवृत्त खाकी वर्दीतील अधिकाऱ्याचे कार्य आज देशभरात प्रेरणादायी ठरत आहे. ३८ वर्षांच्या शासकीय सेवेनंतरही त्यांनी विश्रांती न घेता शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारलेला हा माहितीचा सेतू आज १२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना जोडत आहे.
अरुण मगर असे या सीआयडीमधून सेवानिवृत्त झालेल्या डीवायएसपीचे नाव आहे. रेशीम क्षेत्रातील माहितीअभावी शेतकरी अडचणीत असल्याचे लक्षात येताच त्यांनी काही शेतकऱ्यांना एकत्र आणत माहितीची देवाणघेवाण सुरू केली. सुरुवातीला छोट्या गटातून सुरू झालेला हा उपक्रम आज राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या समूहात परिवर्तित झाला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून ते सातत्याने दररोज बाजारभाव, त्याचे विश्लेषण आणि विविध बाजारपेठांतील दरांची तुलना शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहेत. याशिवाय तुती लागवड, बीज केंद्रे, प्रशिक्षण संस्था, नर्सरी, खरेदीदार बाजारपेठ, शासकीय कार्यालये, तज्ज्ञ मार्गदर्शन आदींची उपयुक्त माहितीही एकाच व्यासपीठावर देण्यात येते.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये अनुभवांची देवाणघेवाण वाढली असून अनेकांच्या अडचणी सोडवल्या जात आहेत. देशभरात सुमारे ९ लाख लोक या माहितीचा लाभ घेत आहेत. दररोज चार तास वेळ देत ते हे कार्य अविरतपणे करत आहेत.
देशातील विविध बाजारपेठांतील दरांची माहिती उपलब्ध झाल्याने स्थानिक बाजारातही स्पर्धात्मक दर मिळू लागले आहेत. शेतकरी अधिक चांगल्या दरासाठी योग्य बाजारपेठ निवडू लागले असून त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे.
सूर्यासारखा प्रकाश देता आला नाही तरी पणतीसारखा उजेड द्यावा, या भावनेतून सुरू झालेल्या या कार्यामुळे हजारो शेतकऱ्यांचा मार्ग उजळला आहे. तंत्रज्ञानाची जोड आणि सेवाभाव यांचा संगम घडवत त्यांनी समाजासाठी एक आदर्श निर्माण केला आहे.
