DakshTimes: Kashinath Shinde
पिंपरी : प्रभाग क्रमांक १६ मधील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर शिवसेना नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी थेट आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला इशारा दिला आहे. “पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा पंपिंग स्टेशन बंद पाडू,” असा इशारा देत त्यांनी महापालिकेला धारेवर धरले आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रभागातील रावेत, किवळे आणि मामुर्डी भागात पाणीपुरवठा अत्यंत अपुरा व कमी दाबाने होत आहे. परिणामी नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असून, पाण्यासाठी दररोज अक्षरशः वणवण करावी लागत आहे. घरगुती वापर, शाळा, तसेच अन्य अत्यावश्यक कामे ठप्प झाली आहेत. तरीही प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने संताप उसळला आहे.
प्रभागासाठी किमान १८०० फ्लो पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात केवळ १६०० ते १६५० फ्लोच पाणीपुरवठा होत असल्याची बाब समोर आली आहे. म्हणजेच तुटवडा माहित असूनही प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
याशिवाय पवना नदीतून पाणीपुरवठा तातडीने सुरू करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. मात्र, याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने परिस्थिती आणखी चिघळत चालली आहे.
दरम्यान, समस्या तातडीने न सुटल्यास पंपिंग स्टेशन बंद पाडण्याचा इशारा नगरसेविका तरस यांच्याकडून देण्यात आल्याने प्रशासनाची झोप उडण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या मूलभूत हक्काचा प्रश्न असताना प्रशासनाची ही उदासीनता संतापजनक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
