TEAM DakshTimes: Kashinath Shinde
आळंदी परिसरातील हनुमानवाडी, ठाकरवस्ती, केळगाव येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली असताना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने अवघ्या काही तासांत आरोपीला अटक करून तपासात मोठी प्रगती साधली आहे. दिनांक ०२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजता एका वृद्ध महिला आणि सहा वर्षांच्या चिमुरडीचा निर्घृण खून झाल्याची माहिती मिळताच आळंदी पोलीस स्टेशनसह गुन्हे शाखेची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.
फिर्यादी संगीता दत्तात्रय केदारी या इंद्रायणी हॉस्पिटल येथे रात्रीची पाळी करून सकाळी घरी परतल्या असता त्यांच्या नाती धनश्री (वय ६ वर्षे) आणि शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे (वय ७० वर्षे) या दोघींचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने खून केल्याचे उघड झाले. या प्रकरणात विनायक भवारी याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेला तात्काळ तपासाचे आदेश देण्यात आले. यावेळी गुन्हे शाखा युनिट-३ ने तपासाची सूत्रे हाती घेत तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. माहिती मिळताच पथकाने आळेफाटा परिसर गाठला आणि पुणे-नाशिक रोडवरील हॉटेल समाधानजवळ सापळा रचत विनायक तुकाराम भवारी (वय ३१ वर्षे, रा. संगमनेर, मुळ रा. तेजूर ता. जुन्नर) याला शिताफीने ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने कौटुंबिक वादातून हे कृत्य केल्याची प्राथमिक कबुली दिली असून पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखालील युनिट-३ पथकाने पोउपनि भरत गोसावी, सुनिल जावळे तसेच पोलीस अंमलदारांच्या टीमसह तांत्रिक विश्लेषण शाखेच्या मदतीने ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार आणि सहा. पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
