Team DakshTimes: Kashinath Shinde
भोसरी, दि. ९ एप्रिल २०२६ :
औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड आणि चाकण परिसरात रोजगाराच्या शोधात दररोज हजारो तरुण-तरुणी येत असतात. मात्र योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे अनेकांना आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागते. ही फसवणूक थांबवण्यासाठी आणि युवकांना सुरक्षित, विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि बाबासाहेब लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र’ भोसरी व चाकण येथे सुरू करण्यात आले आहे.
भोसरीतील संविधान चौकाजवळील फुगे प्रायमा येथे या केंद्राचे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी डॉ. संजय झोपे, संदीप पलांडे, प्रकाश लांडगे, कैलास लांडगे, प्रथमेश शेलार, आकाश कंद, प्रतीक शिंदे, ॲड. प्रतीक बोराडे, संदीपक राठी, निखिल मसने, प्रशांत पवार, रुपेश खोपडे, जयश्री वाघमोडे, कांचन जगताप, कृष्णा अगरवाल, अब्दुल अहमद आदी मान्यवर उपस्थित होते.
या केंद्राच्या कार्यपद्धतीबाबत माहिती देताना महापौर रवि लांडगे म्हणाले की, आर्थिक अडचणींमुळे मागे पडणाऱ्या होतकरू युवक-युवतींसाठी हे केंद्र संपूर्णतः ‘विनामूल्य’ आहे. नोकरीच्या शोधात बाहेरून येणाऱ्या अनेकांना राहण्याची सोय, नोकरी मिळवण्याची प्रक्रिया आणि करिअर मार्गदर्शन यामध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. काही ठिकाणी एजंटांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूकही केली जाते. या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा शुल्क न आकारता नोंदणी, नोकरीची संधी, राहण्याबाबत मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशन अशा सर्व सुविधा या केंद्रातून उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
‘विनामूल्य नोकरी’ हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून, युवकांनी कोणताही आर्थिक भार न घेता या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आतापर्यंत सुमारे दोन हजार युवक-युवतींनी या उपक्रमाचा लाभ घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.
दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग तसेच पदवीधर विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. भोसरी येथील फुगे प्रायमा (A विंग, तिसरा मजला, कार्यालय क्र. १२) तसेच चाकण येथील कॅपिटल स्क्वेअर येथे ही सुविधा उपलब्ध आहे. अधिकाधिक युवकांनी नोंदणी करून आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी तरुणांना केवळ रोजगारच नव्हे, तर सन्मानाचे जीवन मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे,” असे सांगत महापौर रवि लांडगे यांनी या उपक्रमामागील भावना व्यक्त केल्या.
