Team DakshTimes: Kashinath Shinde
बारामती : आईच्या त्याग, संस्कार आणि अथक परिश्रमांचा सन्मान करणारा एक भावस्पर्शी सोहळा रविवारी (दि. १२ एप्रिल) ज्येष्ठ नागरिक संघ, बारामती येथे पार पडला. लीनेस क्लबतर्फे आयोजित ‘माँ से बेटी सवाई’ या कार्यक्रमात निंबूत गावच्या नंदा काकडे यांना आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यात राधिका जाचक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि सन्मानचिन्ह देऊन नंदा काकडे व ॲड. सुप्रिया बर्गे यांचा गौरव करण्यात आला.
समाजात घडणाऱ्या प्रत्येक यशस्वी मुलीमागे तिच्या आईचे संस्कार आणि कष्ट दडलेले असतात, याची जाणीव करून देत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलींच्या मातांचा गौरव करण्याचा हा उपक्रम होता. मुलींचे संगोपन, शिक्षण आणि संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित करत मुलगी जन्माला येणे ही भाग्याची गोष्ट आहे हा सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला.
स्त्रीभ्रूण हत्या रोखणे, कायदेविषयक जनजागृती, कौटुंबिक समुपदेशन आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांत गेली १८ वर्षे सातत्याने कार्यरत असलेल्या ॲड. सुप्रिया विशाल बर्गे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांच्या आई नंदा काकडे यांचा सन्मान करण्यात आला. अत्यंत खडतर परिस्थितीत मुलीला वाढवून, शिक्षण देऊन स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट आणि दिलेले संस्कार यामुळेच सुप्रिया बर्गे यांचे वकिली क्षेत्रातील कर्तृत्व उजळून निघाले, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. तर प्रत्येक आईने आपल्या मुलींना शिक्षण देऊन स्वावलंबी बनवण्यासाठी पुढाकार घेतला, तर समाज अधिक सक्षम आणि समृद्ध बनेल, असे ॲड. सुप्रिया बर्गे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
सूत्रसंचालन मोनिका गांधी यांनी केले, तर प्रस्तावना सोनाली मुनोत यांनी मांडली. आभार शुभांगी चौधर यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन शीतल यादव, रीनल शाह आणि मोनिका गांधी यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले. यावेळी सीमा चव्हाण, विजया कदम, धनश्री भाभी आणि उज्वला शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
