Team DakshTimes: Kashinath Shinde
पिंपरी-चिंचवड | ९ एप्रिल
शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पोलीस दलात तब्बल ५० नव्या वाहनांची भर पडली असून, यामुळे पोलिसांची कार्यक्षमता आणि प्रतिसादाचा वेग लक्षणीयरीत्या वाढणार आहे.
या नव्या ताफ्यात ८ चारचाकी (स्कॉर्पिओ एन) आणि ४२ दुचाकी (होंडा अॅक्टिवा) वाहनांचा समावेश आहे. ही सर्व वाहने ८ एप्रिल २०२६ रोजी अधिकृतपणे पोलीस दलात दाखल करण्यात आली.
या निर्णयामुळे पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला गती मिळणार असून, शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत आवश्यक भर मानली जात आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या पुढाकारातून जिल्हा नियोजन समितीच्या मंजुरीने हा ताफा उभारण्यात आला आहे. त्यांच्या कार्यकाळात पोलीस यंत्रणा अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानाधारित करण्यावर विशेष भर दिला जात आहे.
वाहनसंख्येच्या दृष्टीनेही मोठी झेप घेतली गेली आहे. आयुक्तपद स्वीकारताना दलाकडे केवळ ३१९ वाहने होती; मात्र आता त्यात ३६७ नव्या वाहनांची भर पडली आहे. जिल्हा नियोजन समितीकडून १०२ मोटारसायकली, १५७ जीप, ३ लाईट व्हॅन आणि १ ट्रक देण्यात आला आहे. तसेच पोलीस महासंचालक कार्यालयाकडून ७१ मोटारसायकली, २ कार, १ जीप, १६ लाईट व्हॅन, १३ बस आणि १ टॅन्कर उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये बजाज कंपनीकडून २५ मोटारसायकली प्रायोजित करण्यात आल्या आहेत.
या नव्या वाहनांमुळे शहरातील गस्त वाढणार असून, गुन्हे प्रतिबंधासाठी अधिक वेगवान आणि अचूक कारवाई शक्य होणार आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ मदत पोहोचवणे अधिक सोपे होईल. प्रतिसादाचा वेळ कमी होऊन पोलीस-नागरिक संवाद अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एकूणच, नव्या वाहन ताफ्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांची कार्यक्षमता, वेग आणि ताकद वाढणार असून, नागरिकांना अधिक सुरक्षित आणि तत्पर सेवा मिळण्याचा विश्वास व्यक्त होत आहे.
